शरद पवार यांचा फोटो, जिल्हाधिकाऱ्यांची खोटी सही अन्.. पत्नीसह लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरोपीला अखेर अटक
Pune Crime : वाइन शॉपचा परवाना देतो म्हणून 53 लाख रोख उकळून बनावट परवाना देत उत्कर्ष सातकर नावाच्या तरुणाने तब्बल 18 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोटो वापरुन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी (shikrapur police) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने त्याच्या पत्नीसह मिळून एकाची तब्बल 53 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटकेनंतर पोलीस तपासात अनेक महत्त्वाच्या बाबी उघड झाल्या आहेत. आरोपी शरद पवार यांचा फोटो वापरून फसवणूक करत होता अशीही माहिती समोर आली आहे.
दिल्लीत वास्तव्य,राजकीय नेत्यांशी जवळीक, अधिकारी यांच्याशी संवाद असल्याचे भासवून वाईन शॉपचा बनावट परवाना देऊन 53 लाखांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला शिक्रापुर पोलीसांनी अटक केली आहे. उत्कर्ष सातकर असे आरोपीचे नाव आहे. या फसवणुकीप्रकरणी शिक्रापुर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने चक्क पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पत्र देखील केल्याचे समोर आले आहे.
आरोपी उत्कर्ष सातकर हा दिल्लीत यूपीएससी अभ्यासक्रमाची तयारी करत होता. त्यावेळी त्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा करत असताना एक फोटो काढला होता. याच फोटोचा वापर करुन त्याने फसवणूक केली. उत्कर्षने त्याच्या विविध सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो स्टेटसला ठेवला होता. याद्वारे उत्कर्षने शिरुर शिक्रापुर परिसरातील अनेक जणांची आर्थिक फसवणूक केली होती. शरद पवार यांचा फोटो वापरुन पवार यांच्यासोबत ओळख असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. दरम्यान अजून कुणाची फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी पोलीसांनी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्रापुर पोलिसांकडून करण्यात आलंय.
फोटो वापरुन मिळवला लोकांचा विश्वास
"फिर्यादी राहुल पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिक्रापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीला उत्कर्ष सातकर आणि त्याची पत्नी अंकिता यांनी FL2 परवाना (fl2 licence) मंजूर करुन देतो असे खोटे सांगून त्यांच्याकडून 53 लाख रुपये उकळले. यासाठी त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या नावाचे आणि बनावट सहीचे पत्र फिर्यादीला दिेले. आरोपी यूपीएससी परीक्षेसाठी दिल्लीला वास्तव्यास होता. दिल्लीला असताना त्याने काही राजकीय लोकांसोबत फोटो काढले होते. ते फोटो तो वारंवार सोशल मीडियावर टाकत होता. त्याचा वापर करुन त्याने लोकांचा विश्वास संपादन केला," अशी माहिती शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली.