सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune News) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातील तरुणाईला मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा (drug) विळखा पडल्याचे समोर आले आहे. पुण्यात अनेकदा कारवाई केल्यानंतरही अंमली पदार्थांची विक्री थांबलेली दिसत नाही. शनिवारी रात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे पथकाने (Pune Crime Branch) मोठी कारवाई करत आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमध्ये तब्बल 2 कोटी 21 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे पोलिसांच्या गुन्हे पथकाने शनिवारी रात्री धडक कारवाई करत मेफेड्रॉन (एम.डी.) हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आजाद रजमान खान (35, मध्य प्रदेश) नागेश्वर रामेश्वर प्रजापती (35 मध्य देशात) अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांकडून पुणे शहरामध्ये अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याकरता विशेष मोहिम राबवण्याच्या सूचना अमली पदार्थ विरोधी पथकाला दिल्या होत्या. 


या अनुषंगाने पोलिसांकडून चंदननगर पोलीस पुणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंके व मारुती पारधी यांना बातमीदारामार्फत मध्य प्रदेशातील ड्रग्ज तस्कर अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. दोन्ही आरोपी नगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवरील स्नेहादिप सोसायटी लगत मेफेड्रॉन (एम.बी.) या अंमली पदार्थ विक्री करता येणार आहे. यानंतर तात्काळ अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व पोलिसांनी सापळा रचून त्याठिकाणी दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 1 किलो 108 ग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी ड्रग्ज जप्त करत आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची बाजारात 2 कोटी 21 लाख 60 हजार इतकी किंमत असल्याचे समोर आले आहे.


मुंबईतही मोठी कारवाई


मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी वांद्रे येथे दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 7.5 लाख रुपये किमतीचे एमडी, प्रतिबंधित सिंथेटिक ड्रग जप्त केले आहे. विशेष अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून, गुन्हे शाखेच्या युनिट सहाने रंग शारदा हॉटेलजवळ हसन शेख (29) आणि पद्मा पाटील (45) या दोघांना अटक केली. झडतीदरम्यान त्यांच्याकडून 36 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घाटकोपरमध्येही अशाच एका कारवाईदरम्यान, गुन्हे शाखेने अमृत नगर परिसरातील अब्दुल शेख (57) याच्याकडून सुमारे 77,000 रुपये किमतीचे चरस जप्त केले आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपींवर अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (NDPS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.