Sharad Pawar Threat Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. गेल्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना सोशल मीडिया वरून दाभोळकर करण्याची धमकी देण्यात आली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलने सुद्धा झाली होती. तर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी कारवाई करत पुण्यातून एकाला अटक केली आहे. सागर बर्वे अस अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. सागर हा आयटी इंजिनिअर असल्याची माहिती मुंबई पोलिसानी दिली आहे. मुबई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी एका 34 वर्षीय इंजिनिअरला अटक केली आहे. पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या सागर बर्वे या आरोपीने वेगळ्या नावाने आयडी तयार करून सोशल मीडियावर धमकीची पोस्ट टाकली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सागर बर्वेला पुण्यात अटक करून मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (13 जून) पोलीस कोठडी सुनावली आहे. लवकरच तुमचा दाभोळकर होईल, अशी धमकी फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली होती.  प्राथमिक तपासानुसार सागर बर्वे कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. मात्र, त्याच्या या कृत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


नरेंद्र दाभोलकरांप्रमाणे शरद पवारांनाही मारले जाईल, असे आरोपी सागर बर्वे याने नर्मदाबाई पटवर्धन यांच्या नावाने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर एलटी मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आणि तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. फेसबुक पोस्ट व्यतिरिक्त, राष्ट्रवादीने आयुक्तांसमोर आणखी एक ट्विट दिले होते. मात्र, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की त्या पोस्टमध्ये कोणाचाही विशेष उल्लेख नव्हता.


दरम्यान, शरद पवार यांना धमकी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगितले होते. शरद पवार हे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते असून त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल. गरज पडल्यास शरद पवारांची सुरक्षा वाढवण्यास पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.