सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : बांगलादेशातील (Bangladesh) एका अल्पवयीन मुलीची पुण्याच्या (Pune Crime) बुधवार पेठेत (Budhwar Peth) विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बांगलादेशातील या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेकायदेशीररित्या भारतात आणले होते. त्यानंतर बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलीची विक्री करून तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Pune Police) दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी कुंटणखाना मालकीण डोलमा राजू तमांग (वय 55, नेपाळ), दलाल महिला मारिया उर्फ सोनी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) आणि एका दलाल पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बांगलादेशातील रहिवासी असलेली पीडित तरुणी अल्पवयीन आहे. दलाल महिला मारिया उर्फ सोनी आणि दलाल असलेला एक नेपाळी पुरुष या दोघांनी या मुलीला पार्लरचे काम देतो असे खोटे सांगितले होते. पीडित मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा येऊन फुस लावत तिला बेकायदेशीररित्या भारतात आणले. त्यानंतर आरोपींनी बुधवार पेठेत कुंटणखाना चालवणाऱ्या डोलमा राजू तमांग या महिलेकडे मुलीला ठेवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. धक्कादायक बाब म्हणजे वेश्या व्यवसायातून मिळणारे पैसे आरोपींनी तिघांनी वाटून घेतले. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.


रागाने बघतो म्हणून विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला


पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात माझ्याकडे कॉलेजमध्ये रागाने का बघितलेस असं म्हणत एका महाविद्यालयीन तरुणाने चक्क कोयत्याने हल्ला केला आहे. नरे परिसरातील एशियन कॉलेजमध्ये 12 ऑक्टोबर रोजी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी महाविद्यालयीन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.


आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मंगळवारी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपीने तू माझ्याकडे काल कॉलेजमध्ये रागाने का बघितलेस असे म्हणत त्याला जाब विचारला. त्यावर फिर्यादीने मी तुझ्याकडे रागाने बघितले नाही असे उत्तर दिले. त्यावर आरोपीने त्याला हाताने मारहाण करत बॅगेतून लोखंडी कोयता बाहेर काढला. त्यानंतर फिर्यादीच्या गुडघ्यावर लोखंडी कोयता उलटा करून वार केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.