पुणे हादरलं! 13 वर्षाच्या मुलीला संपवून बापाचा आत्महत्येचा प्रयत्न
Crime News : मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे
सागर आव्हाड, झी मीडिया पुणे : सुसंकृत शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात (Pune News) गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime News) घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सख्खा बापानेच 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबवता हत्येनंतर आरोपी पित्याने मुलीचा मृतदेह पाण्यात फेकून दिला. यानंतर पित्यानेही विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु केला आहे.
स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. आरोपी पित्याने मुलीचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह वाहत्या कॅनॉलमध्ये फेकून दिला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी कॅनॉलजवळ धाव घेतली. यासोबत अग्निशमन विभागालाही पाचारण करण्यात आले आहे. गेल्या काही तासांपासून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान मुलीचा मृतदेहाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप मृतदेह सापडला नाही. तर दुसरीकडे विषारी औषध प्यायल्याने मयत मुलीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वारगेट पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
खडकवासला धरणात आढळला मृतदेह
दुसरीकडे पुण्याच्या खडकवासला धरणाच्या पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. नदीच्या पाण्यात हा मृतदेह वाहून आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा मृतदेह पुरुषाचा असून त्याचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे इतके असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या कुडजे गावच्या हद्दीत हा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पुण्याच्या एनडीए परिसरात असणाऱ्या कुडजे गावच्या हद्दीत काही जण या पाण्याच्या परिसरातून जात होते. त्याचवेळी त्यांना खडकवासला धरणाच्या पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. मृतदेह असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना याबाबत माहिती दिली. अग्निशमन विभागाने बोटीच्या सहायाने हा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, हा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून आला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेह जिथे आढळला त्या परिसरात मृतदेहाचे कोणतेही कपडे अथवा कोणतीही वस्तू आढळलेली नाही. पोलिसांनी याबाबत खडकवासला धरण परिसरातील आजूबाजूच्या गावात चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.