सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) खुलेआम वेश्या व्यवसाय (prostitution) सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या कात्रज परिसरात (katraj) हा सगळा प्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील कात्रज परिसर नव्याने विकसित होत आहे. या परिसरात अनेक छोट्या-मोठ्या सोसायटी, शाळा, कॉलेज आहेत. मात्र या परिसरात खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असल्याने येथील नागरिक विशेषतः महिला त्रस्त झाल्या आहेत. या सगळ्या प्रकाराविरोधात आता मनसेने (MNS) कारवाईचा इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कात्रजकडून नवली पुलाच्या दिशेने जाताना या भागात अनेक लॉज आहेत. या लॉजवर सुरू असणाऱ्या अनधिकृत वेश्या व्यवसायाचा या परिसरातील महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासाला कंटाळून येथील महिलांनी पोलिसांना, आमदारांना, खासदारांना यासंबंधीचे निवेदन दिले होते. मात्र कुठलीही कारवाई न झाल्याने या महिलांनी अखेर मनसेचे नेते वसंत मोरे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर वसंत मोरेंनी थेट या लॉजवरच धाड टाकली. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाला आणि लॉज मालकांनाही इशारा दिला आहे.


या गजबजलेल्या भागात उघडपणे दिवसाढवळ्या देखील वेश्या व्यवसाय सुरु असतो.  स्थानिक महिला तोंडाला स्कार्फ बांधून रिक्षा किंवा बससाठी या ठिकाणी उभ्या असतात. त्यांनाच वेश्या समजून या महिलांकडेच विचारणा केली आहे. त्यामुळे येथील महिलांना नाहक हा त्रास सहन करावा लागत आहे. जे सर्वसामान्य नागरिकांना दिसून येते ते पोलिसांना दिसत नाही का असा संतप्त सवालही येथील महिलांनी केला आहे.


...तर आम्ही मागे पुढे बघणार नाही - वसंत मोरे


"आंबेगाव रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर अनाधिकृतपणे वेश्या व्यवसाय चालतो. या व्यवसायाचा त्रास परिसरातील महिलांना त्याचा त्रास होतो. एक महिला तिच्या मुलाची वाट पाहत उभी असताना एका व्यक्तीने तिची छेड काढली. या परिसरातील महिलांनी पोलिसांना, आमदारांना, खासदारांना निवेदनं दिलं. त्यानंतर लोक माझ्याकडे आले. महिलांच्या तक्रारीनंतर आम्ही चार लॉजला निवदेन दिलं आहे. निवेदनामध्ये या रस्त्यावर अनाधिकृत वेश्या व्यवसाय चालतो असे सांगितले आहे. ज्या महिला रस्त्यावर उभ्या राहतात त्यांचे एजंट इथे फिरत असतात. त्यांच्यापासून सोसायटीमधील महिलांना त्रास होतो. सगळ्या महिला तोंड बांधून तिथून जात असतात. त्यामुळे कोण कसं आहे कुणाला कळत नाही. त्यामुळे या महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन सगळ्या लोकांचा सारखाच असतो. त्यामुळे सगळ्या महिल्या रस्त्यावर उतरल्या आहेत. मला लॉजवाल्यांना इशारा द्यायचा आहे की, इथून पुढे आम्हाला कोणीही अनाधिकृतपणे वेश्याव्यवसाय करताना आढळले तर आम्ही त्याचा चौरंगा करायला मागे पुढे बघणार नाही," असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.


"या सगळ्या जागांचे मालक मराठी आहेत आणि त्यांनी सगळ्या शेट्टी लोकांना लॉज चालवायला दिले आहेत. या हॉटेलमध्ये दिवसा रात्री वेश्या व्यवसाय चालतो असा आरोप महिलांचा आहे. महापालिकेला सुद्धा विनंती आहे की इथल्या सगळ्या स्ट्रिट लाईट बंद आहेत. अंधाराचा फायदा घेतला जातो. आम्ही चारही हॉटेलची पाहणी केली आहे," असेही वसंत मोरे म्हणाले.