Mulshi Drone : पुण्याच्या मुळशी (Mulshi) भागात गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने ड्रोन फिरताहेत. एकाच वेळी तीन तीन चार चार ड्रोन (Drone) आकाशात घिरट्या घालतात. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने ड्रोन फिरतात. लाल हिरवे लाईट्स असलेले ड्रोन पाहून अनेकांची झोप उडाली आहे. पुण्याच्या मुळशी भागातलं दररोज रात्रीचं हे दृश्य झालंय. हे ड्रोन नेमके कुणाचे, रात्री हे ड्रोन कशासाठी घिरट्या घालतात? असे अनेक प्रश्न मुळशीच्या नागरिकांना सतावतायत.. त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालुक्यात ड्रोनची दहशत


पुण्याच्या मुळशी भागात रात्री उडणाऱ्या ड्रोनची दहशत पसरली आहे. अगदी हिंजवडी आयटी पार्क पासून भूगाव, पौड पर्यंत अशा संपूर्ण मुळशी तालुक्यात या ड्रोनची दहशत पसरली आहे. काही दिवसांपूर्वी असेच ड्रोन या परिसरात फिरत होते. एक दोन एका घरावर देखील कोसळला होता. त्याचेही गूढ अजूनपर्यंत उलगडलेलं नाही. दरम्यानच्या काळात ड्रोन दिसणं बंद झालं होतं. मात्र आता पुन्हा हे ड्रोन घिरट्या घालत आहेत.


या परिसरात किमान दोन डझनभर ड्रोन फिरत असल्याची चर्चा आहे. या ड्रोन्सच्या हालचाली रोखण्यासाठी दोन विरोधी यंत्रणा खरेदी करणार असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी मागेच म्हटलं होतं. त्याचं काय झालं हे देखील कळू शकलेलं नाहीये. ड्रोनद्वारे चोरी करण्याचा उद्देश आहे का? ड्रोनद्वारे रेकी केली जात आहे का? अशा एक ना अनेक शंका गावकऱ्यांनी उपस्थित केल्या आहेत. संरक्षणासाठी नागरिक रात्रभर पहारा देत आहेत. मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन पुणे पोलिसांनी केलंय.


गावागावात ड्रोन उडणारे विजुअल्स व्हायरल होत आहेत. फक्त पुणे जिल्ह्यातलं मुळशीच नाही तर सातारा, बीड, अहमदनगर, जालना अशा अनेक ठिकाणी ड्रोनने लोकांची झोप उडवली आहे. ड्रोन उडवणाऱ्यांना पकडण्यासाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी गावकरी पळापळही करतायत. दरम्यानच्या काळात मुळशीत ड्रोन दिसणं बंद झालं होतं. मात्र आता पुन्हा हे ड्रोन घिरट्या घालत आहेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जातेय.