Pune Rain News : पुणे शहरात मुसळधार पाऊस, पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी; `या` भागांना झोडपलं!
Pune Heavy Rainfall : पुणे शहरातील बिबवेवाडी,अप्पर, मार्केट यार्ड परिसरात सायंकाळी चांगला पाऊस झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याचं देखील दिसून आलंय.
Pune Rain News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काल दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी (Pune Heavy Rainfall) लावल्याचं दिसून आलं होतं. अशातच पुण्यात आज सकाळपासून पावसाची संतधार सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. तर कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येतंय. पुण्याच्या (Pune News) कोथरूड, हडपसर, विद्यापीठ, विमाननगर भागात ढगाळ वातावरण तयार होऊन हळूहळू पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे.
'या' जिल्ह्यात पावसाच्या सरी
पुणे शहरातील बिबवेवाडी,अप्पर, मार्केट यार्ड परिसरात सायंकाळी चांगला पाऊस झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याचं देखील दिसून आलंय. काही वेळ नागरिकांना अडचणींचा सामना देखील करावा लागला. मुंबई, रायगड, जालना, औरंगाबाद, पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, ठाणे या जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज
पुढील 24 तासांत कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यात 4 ते 5 दिवस पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.
नागपूरात कोसळधार
नागपुरात मध्यरात्री ढगफुटीसदृश पाऊस पडलाय. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं शहरात कहर केलाय. 2 तासांत 90 मिमी पाऊस पडल्याने महापूर आला. अंबाझरीमध्ये पावसाचं पाणी घरांमध्येही शिरलंय. या पुराच्या पाण्यात आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. मोरभवन बसस्थानकात 12 ते 15 बसेस पावसाच्या पाण्यात अडकल्या. यात मध्यरात्री हॉल्ट करून थांबलेले चालक वाहक सुद्धा बसमध्ये अडकले होते त्यांची आता सुटका करण्यात आलीय. तर झाशी राणी चौक ते सीताबर्डी मेट्रो इंटरचेंज जाणाऱ्या मार्गावरून चक्क नदी प्रवाहीत होऊन शहरात पाणी शिरलंय.