पुणेकरांचं ट्रॅफिकचं टेन्शन संपलं, 74% काम पूर्ण! सर्वात महत्त्वाचा मेट्रो मार्ग कधी सुरु होणार पाहिलं?
Pune Metro Update: पुण्यातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या परिसरातून जाणाऱ्या या मेट्रो मार्गाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. असं असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे.
Pune Metro Update: हेल्मेट सक्ती, पोलिसांची वाढती गस्त, वाहतूक कोंडी यासारख्या अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत असलेल्या पुणेकरांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचं 74 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालं आहे. हा मार्ग शिवाजीनगर, बाणेर, बालेवाडी आणि हिंजवडीला जोडतो. लवकरच हा मार्ग सुरु होणार असून तो कधी सुरु होणार याची संभाव्य माहितीही समोर आली आहे.
आयटी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा
शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानचा हा 23.2 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग 8312 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार या प्रोजेक्टचं काम सुरु असून तो वेळेत पूर्ण होणार आहे. मेट्रोच्या या मार्गिकेमुळे पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजेच आयटी वर्कर्सला मोठा दिलासा मिळणार आहे. रोजच्या वाहतूक कोंडीमधून या कर्मचाऱ्यांची सुटका होणार असून मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
रोजची कसरत वाचणार
मेट्रोचा हा मार्ग बऱ्याच रहिवाशी भागांबरोबरच कमर्शिअल भागांमधून जात असल्याने यामुळे अनेकांची सोय होणार आहेत. बाणेकर, बालेवाडी आणि हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे येथे रोज सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडीची मोठी समस्या जाणवते. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत ऑफिसला पोहचल्यानंतर सायंकाळी पुन्हा हीच कसरत करावी लागते. म्हणूनच या मार्गावर मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कधी सुरु झालेलं काम?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 डिसेंबर 2018 रोजी या मेट्रो मार्गाची पायाभरणी केली होती. बालेवाडी, बाणेर आणि हिंजवडीमधील रहिवाशांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याने ही मेट्रो या परिसराच्या भरभराटीसाठी आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वरदान ठरणार आहे.
कधीपर्यंत पूर्ण होणार हा प्रकल्प
पीएमआरडीएचे मुख्य अभियंते रैनज पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पातील आर्थिक तरतुदीमधून जे उद्देश समोर होतं त्यापैकी 63 टक्के उद्देश साध्य करण्यात आलं आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे. या प्रकल्पाचं एकूण 74 टक्क्यांहून अधिक काम जवळपास पूर्ण झालं आहे. त्यामुळेच हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होऊन मार्च 2025 मध्ये ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काम सुरु झाल्यानंतर साडेसहा वर्षात ही मेट्रो धावणार आहे.