एमआरआयसाठी आलेल्या महिलेचं अश्लिल चित्रण, पुण्याच्या जहांगीर रुग्णालयातला प्रकार
एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचं अश्लील चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.
पुणे : एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचं अश्लील चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. इथल्या जहांगीर रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोट दुखत असल्यामुळे पीडित महिला या रुग्णालयात गेली होती. एमआरआय काढण्यासाठी कपडे बदलत असताना रुग्णालयातील वॉर्डबॉयनं मोबाईद्वारे तिचं चित्रिकरण केलं. हा प्रकार संबंधीत महिलेच्या लक्षात येताच तिनं पतीला याची माहिती दिली. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलीस स्थानकात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी महिलेचं चित्रीकरण करणाऱ्या लंकेश ऊतेकर याला ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, ऊतेकर हा रुग्णालयाचा कर्मचारी नाही, तो साफसफाई करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीचा कर्मचारी आहे, असं जहांगीर हॉस्पिटलनं स्पष्ट केलं आहे. एमआरआय रूममध्ये मोबाईल बाळगण्याची परवानगी नसतानाही त्याने मोबाईल नेला होता. याप्रकरणी आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत आणि तसेच संबंधित एजन्सीसोबत असलेला करारही रद्द करणार आहोत असंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. जहांगीर हॉस्पिटलची ७३ वर्षाची विश्वासाची परंपरा आम्ही यापुढेही कायम ठेऊ, संबंधित रुग्णाची रुग्णालय प्रशासनाच्या वतीने माफी मागण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांना आम्ही संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे जहांगीर रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.