युपीएससी उत्तीर्ण होऊनही दिव्यांग जयंत नियुक्तीसाठी झगडतोय
पुण्यातल्या जयंत मंकले या तरूणाला प्रत्यक्ष नियुक्तीसाठी झगडावं लागतंय
अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : युपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही पुण्यातल्या जयंत मंकले या तरूणाला प्रत्यक्ष नियुक्तीसाठी झगडावं लागतंय. दिव्यांगत्वावर मात करत जयंत युपीएससीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झालायं. पदभरतीची प्रक्रिया सुरु झालीयं, पण आतापर्यंत लागलेल्या दोन्ही याद्यांमध्ये त्याचं नाव नाही. पुढच्या आठवड्यापासून फाऊंडेशन कोर्सही सुरू होतोय. पण याबद्दलही जयंतला काहीच कळविण्यात आले नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी जयंतचे फोनवर बोलणे होते पण कोणीही त्याला लेखी देत नसल्याचेही जयंत सांगतो.
पंतप्रधानांकडे न्याय
दिव्यांगावरचा हा अन्याय आहे, मला सहानुभूती नको, आपला हक्क हवाय असं जयंतचं म्हणणं आहे. आता जयंतनं यासंदर्भात थेट पंतप्रधानांकडेच दाद मागितलीय. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचे ट्वीट त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलंय. पंतप्रधान या गोष्टीकडे लक्ष देतात का ? जयंतला न्याय मिळतो का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणारं आहे.