Pune Crime : पुण्यात कोयता संस्कृती वाढतेय, शाळकरी विद्यार्थ्यांकडून मित्रावर कोयत्याने हल्ला
Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आता हे लोण शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं आहे, त्यातच बालसुधारगृहातून कोयता गँगचे सात सदस्य पळून गेले
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune) कोयता संस्कृती दिवसेंदिवस वाढत आहे. कोयत्या गँगच्या (Koyta Gang) दहशतीने पुणेकर धास्तावले असून त्यांना पोलिसांचीही (Pune Crime News) भीती वाटेनाशी झाली आहे. आता तर ही संस्कृती शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये पसरु लागली आहे. क्षुल्लक कारणावरुन एका विद्यार्थ्याने आपल्या विद्यार्थी मित्रावर हल्ला केला. यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्याबरोबर असलेला आणखी एक विद्यार्थ्याला मार बसला आहे. 17 वर्षांच्या दोन तरुणांनी कोयत्याने हा हल्ला केला. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
क्षुल्लक वादातून कोयत्याने हल्ला
समीर पठाण असं आरोपीचं नाव आहे तर विजय आरडे असं जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे. हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असून दोघांही बारावीत शिकतात. घटनेच्या दिवशी विजय आरडे हा समीर पठाण यांच्या मैत्रिणीशी बलोत बस स्टॉपवर बसला होता. याचा राग आल्याने समीरने कोयत्याने विजयवर हल्ला केला. यात विजयच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तर विजयच्या बाजूला बसलेला आणखी एक विद्यार्थीही जखमी झाला.
बालसुधारगृहातून कोयता गँग फरार
दरम्यान, पुण्याच्या येरवड्याच्या बालसुधारगृहातून कोयता गँग फरार झालीय .मध्यरात्री कोयता टोळीतील 7 सदस्य सुधारगृहातून पळून गेले. या सातही जणांना वेगवेगळ्या गुन्हा प्रकरणात बालसुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. काल रात्री 11 ते 12 च्या सुमारास सुधारगृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून 7 जणांनी पळ काढला. हे सातही विधी संघर्ष बालक पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगचे सदस्य आहेत.
पुण्यातील येरवड्यातल्या पंडित जवाहरलाल नेहरु बालसुधारगृहात या सातही विधी संघर्ष बालकांना ठेवण्यात आलं होतं. हे सातही जण काल रात्री सुधारगृहातून पळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शिडी लावून बालसुधारगृहाच्या खिडकीमधून या सातही जणांनी पलायन केलं. त्यांना पकडणं आता पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
पुण्याला कोयता गँगचं ग्रहण
काही महिन्यांपासून पुण्याला कोयता गँगचं ग्रहण लागलंय. हडपसर, सिंहगड रोड, वारजे, विश्रामबाग परिसरात कोयता गँगनं सळो की पळो करुन सोडलं होतं.. हातात कोयते घेऊन ही गँग दुकानांमध्ये तोडफोड करायची, रात्रीच्या अंधारात पार्किंगमध्ये उभ्या गाड्यांची तोडफोड करायची.. काहीच दिवसात या गँगची हिंमत इतकी वाढली की भरदिवसा ही गँग दहशत माजवू लागली..विशेषत व्यापा-यांमध्ये दहशत माजवण्याचा या गँगचा प्रयत्न होता.. या गँगनं केलेल्या तोडफोडीत लाखो रुपयांचं नुकसान झालं.. अखेर पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी जोरदार शोधमोहीम सुरू केली. हॉटेल, लॉज, एसटी डेपो, रेल्वे स्थानक परिसरात रात्रभर कोंबिंग ऑपरेशन केलं.
पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. मात्र कोयता गँगचं पुण्याला ग्रहण लागलंय. कोयता गँगने जो धुमाकूळ घातलाय त्यामुळे पुणेकर हैराण आहेत. पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले, कोयता गँगच्या मुसक्याही आवळल्या.. मात्र सिनेस्टाईलनं भिंतींना शिडी लावत या गँगचे काही सदस्य जेलमधून फरार झाले.. त्यामुळे या गँगला पकडण्याचं तसंच नागरिकांमधील दहशत मिटवण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.