सागर आव्हाड, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राष्ट्र म्हणून ओळखले जाते. मात्र अजूनही काही भागांत अंधश्रद्धा आणि जादूटोणा यावर विश्वास ठेवला जातो. गेल्या काही दिवसांपासून गुप्त धनचे अमिष दाखवून गुन्हांच्या घटनेत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. पुण्यात असाच एक प्रकार घडला आहे. ज्योतिषाशी संगनमत करुन एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरला तब्बल २८ लाखांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. 


घरावर विघ्न आले आहे. घरातील समस्या दूर करण्यासाठी धार्मिक विधी कराव्या लागतील. तसेच शारीरीक दोष दूर करण्यासाठी जादुटोणा करावा लागेल, असे सांगून पत्नीच्या भावाने ज्योतिषाशी संगनमत करुन एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरला तब्बल २८ लाखांना गंडा घातला आहे. 


धानोरी येथील एका ३३ वर्षांच्या व्यावसायिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी अभिषेक कुलकर्णी काका, विजय गोविंद जाधव सदाशिव फोडे यांच्यावर नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्य प्रतिबंध निर्मुलन व काळी जादु अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ दरम्यान सुरु होता. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांच्या घरात काही समस्या जाणवत होत्या. त्यांच्या पत्नीच्या भावाने यासाठी आपल्या ओळखीचा एक ज्योतिषी असल्याचे सांगितले. अभिषेक कुलकर्णी काका याने हस्तरेषा तज्ज्ञ व ज्योतिष असल्याचे भासवले. तो एके दिवशी घरी आला त्याने फिर्यादी यांचा हात पाहून घरातील अडचणी दूर करण्यासाठी एक यंत्र बसवावे लागेल, असे सांगितले. त्यांच्यासाठी हे यंत्र १७ लाख ४६ हजार रुपयांचे तर, भावासाठी २ लाख ८९ हजार रुपयांच असल्याचे सांगितले. 


आरोपींनी सांगितल्यानुसार फिर्यादीने ज्योतिषी काकाचा ड्रायव्हर सदाशिव फोडे याच्या बँक खात्यावर त्यांनी पैसे पाठविले. त्याने यंत्र आणून घरात बसविले. त्यानंतर त्यांना परिस्थितीत फरक पडला असा भास झाला. त्यानंतर वेळोवेळी घरातील इतर समस्या, कोरोना प्रतिरोध, पितृदोष, घरशांतीसाठी धार्मिक विधी करावे लागेल, असे सांगून त्यांच्याकडून ते पैसे लुटत राहिले. 


दरम्यान, एके दिवशी कुलकर्णी काका त्यांच्या घरी आले. त्यांनी तुमच्या व भावामध्ये असलेले शारीरीक दोष दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगितले. त्यांच्या घरी पुजा केली. त्यात त्याने कणकेचे पुतळे तयार केले. त्या पुतळ्यांना घरातील दागिने घालण्यास सांगितले. त्यानंतर आता हे पुतळे मठात घेऊन जाणार असून तेथे आठ दिवस पुजा करण्यात येणार असल्याचे सांगितले. 


आरोपी दागिन्यांसह पुतळे घेऊन गेले. त्यानंतर ते पुन्हा आलेच नाहीत. दरम्यान, लॉकडाऊन सुरु झाल्याने त्यानंतर तुमचे दागिने परत करतो, असे तो सांगत होता. त्यानंतर त्यांचा संपर्क होत नव्हता. फिर्यादीने पत्नीच्या भावाला विचारले तर त्याने आपल्याला काही माहिती नाही. असे सांगून हात वर केले. शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.