COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : माणसाचा जीव इतका स्वस्त आहे का असा सवाल मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुण्यातील ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी उपस्थित केला आहे. गोडबोले या मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. त्यावेळी रस्त्यावरील ३ कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला करून शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले आहेत. यामुळे परिसरात एक भीतिचं वातावरण आहे. 


पुण्यातील भटक्या कुत्रयांचा प्रश्न यानिमित्तानं पुन्हा अधीरेखित झाला आहे. शहरात आज घडीला सुमारे दीड लाखांहून अधिक भटकी कुत्री आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी १० हजारांहून जास्त नागरिकाना चावा घेतला आहे. २००५ मध्ये ९ हजार १४५ जणांना कुत्रा चावला होता. २०१५ मध्ये हा आकडा १८ हजार ५६७ वर पोचला होता. २०१७ मध्ये हे प्रमाण कमी झालं. वर्षभरात १० हजार ३४० जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा  घेतला.


महापालिकेतर्फ़े राबवण्यात आलेल्या उपाययोजना ही संख्या कमी होण्यास काही प्रमाणात कारणीभूत आहे. मात्र या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचं म्हणावं लागेल. त्यामुळे महापालिका तसेच श्वानप्रेमींकडे कुत्री आवरा असं म्हणण्याची वेळ आलीय.