Pune Crime News: `पुणं इतकं हिंस्त्र नव्हतं, दिवसाढवळ्या कोयत्यानं ...`, अजित पवारांनी ओढले गृहमंत्र्यांवर ताशेरे!
Ajit Pawar On MPSC Student Attack: सदाशिव पेठेत विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला (Koyta Attack) करण्यात आल्याचा प्रकार घडला. राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
MPSC Student Attack in Pune: विद्येचं माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहरात (Pune News) गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात एमपीएससी पास (MPSC) झालेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) या तरुणीची हत्या झाली होती. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याची माहिती समोर येत नाही, तोपर्यंत आणखी एका घटनेने पुणे हादरल्याचं पहायला मिळतंय. पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या सदाशिव पेठेत एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला (Koyta Attack) करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय. त्यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
अजितदादा संतापले
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा आणि सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो, असं ट्विट अजित पवार (Ajit Pawar On MPSC Student Attack) यांनी केलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणतात...
पुणे शहरात भररस्त्यात तरुणीच्या मागे कोयता घेऊन धावणाऱ्या तरुणाला अडवून त्या मुलीचे दोन धाडशी तरुणांनी प्रसंगावधान राखून प्राण वाचवले. तरुणांनी दाखविलेले धाडस अतिशय कौतुकास्पद आहे. मुलीवर प्राणघातक हल्ला होत असताना आपल्या प्राणाची पर्वा केली नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तरुणांचं कौतूक केलं आहे.
आणखी वाचा- पुण्यातील सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम
दरम्यान, प्रेम संबंधास नकार दिल्याने या तरुणीवर हा हल्ला करण्य़ात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात युवती जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. विश्रामबाग पोलिसांनी तरुणाला अटक केली. आपपासच्या नागरिकांनी धाव घेत तरुणीचा जीव वाचवला आहे. शंतनूचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. मात्र तिने त्याला नकार दिला. तसंच त्याच्याशी बोलणे टाळले होते. मात्र तो सातत्याने तिला कॉलेजजवळ येऊन फोन करायचा तसंच, धमकी द्यायचा, असं पीडित तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. माझा काही दोष नसताना माझ्यावर हल्ला करण्यात आला, असं म्हणत तरुणीने आपबिती सांगितली आहे.