पुण्यात लग्नासाठी पोहोचलेल्या वऱ्हाडींवर धावपळ करण्याच वेळ आली. लग्नघटिका सुरु होण्यापूर्वीच वऱ्हाडींना हॉल सोडून बाहेर जावं लागलं. याचं कारण पालिकेने अतीक्रमण विरोधी कारवाई करताना लग्नाचा हॉलच पाडून टाकला. यामुळे नवरदेव आणि नवरीमुलगीसह सर्वांवरच बाहेर रस्त्यावर उभं राहून कारवाई पाहण्याची वेळ आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील डी पी रोडवर पालिकेच्या अतीक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई केली जात आहे. अतीक्रमण विभागाकडून अनधिकृत रेस्तराँ, हॉटेल्स, मंगल कार्यालयं आणि लॉन्स यांच्यावर कारवाई करत बुलडोझर चालवला जात आहे. दरम्यान सध्या लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेक हॉल आणि लॉनचं बुकिंग करण्यात आलं होतं. पण पालिकेच्या कारवाईमुळे त्यांचा मुहूर्त हुकला. 


डी पी रोडवरील एका लॉन्सवर असंच एका लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण लग्नघटिका सुरु होण्याआधीच पालिकेने बांधकाम पाडून टाकल्याने वऱ्हाडींकडे पाहत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. यावेळी काही वऱ्हाडींनी संतापही व्यक्त केला. नवरेदवाने सांगितलं की, एक ते दीड महिन्यापूर्वी 25 हजार रुपये देऊन आम्ही बुकिंग केलं होतं. काल रात्री त्यांनी फोन करुन उद्या अतीक्रमण विभाग कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं. 


दरम्यान काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई महामार्गावर पाषाण येथे अनधिकृतपणे उभारलेल्या फर्निचर मॉल, शो-रुम कारवाई करण्यात आली होती. पुणे बांधकाम विकास विभागाच्या वतीने जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 1 लाख चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले. यामध्ये दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 


हे बांधकाम HEMRL (High Energy Materials Research Laboratory) या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉलमुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण येत होता. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान फर्निचरचे मोठे दुकान पाडल्याने येथे फर्निचर स्वस्त मिळत असल्याचे अनेकांना वाटले. या रस्त्यावर फर्निचर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. रस्त्याच्या दुतर्फा गाड्या लावून लोकं डिस्काऊंटमध्ये फर्निचर खरेदीसाठी जाऊ लागली आहेत.