नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुणे महापालिका आता १८०० किलोमीटरचे रस्ते उखडून टाकणार आहे. त्यावरून नवा वाद पेटणार आहे. पाहूया नेमकं काय आहे प्रकरण.


शहरभर रस्ते उखडले जाणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समान पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेने टेंडर मंजूर केली आहेत. या कामातला सर्वात मोठा भाग म्हणजे पाण्याच्या नव्या पाईपलाईन टाकणे. शहरात १८०० किलोमीटरच्या वेगवेगळ्या पाईपलाईन टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी शहरभर रस्ते उखडले जाणार आहेत. 


नवे रस्ते करण्याशिवाय पर्यायही नाही


जुने रस्ते उखडून नवे रस्ते करण्याशिवाय पर्यायही नाही. पण पुढील वर्षासाठी म्हणजे २०१८-१९ साठी महापालिकेचं रस्त्यांसाठी सहाशे कोटींचं बजेट आहे. त्यात अनेक नवे रस्ते बनवण्याचा समावेश आहे. त्यामुळे पाईपलाईनचं काम पूर्ण होईपर्यंत नवे रस्ते बनवू नयेत आणि मनपाचं कोट्यवधींचं आर्थिक नुकसान टाळावं अशी मागणी करण्यात येतेय. हा खर्च टाळण्यासाठी महापालिकेच्या रस्ते विभाग आणि पाणीपुरवठा विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या दोन्ही विभागांनी समन्वयाने काम करण्याचं आश्वासन दिलंय. 


मनपाने नुकसान टाळावं...


मनपाच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणं आत्तापर्यंत समोर आली आहेत. त्यात मनपाचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. याची झळ करदात्यांनाच बसते. त्यामुळे आता सामाजिक संस्थांनी लक्षात आणून दिल्यावर तरी मनपाने सजग राहून नुकसान टाळावं अशी अपेक्षा आहे.