सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पोलीस भरतीच्या (Police Bharti) प्रकियेदरम्यान अनेक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर येत आहेत. पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून तरुण-तरुणी मुंबई पुण्यासारख्या (Pune News) मोठ्या शहरांमध्ये येत आहेत. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसोबत त्यांचे पालक देखील येत आहेत. मात्र पुण्यात एका उमेदवारासोबत आलेल्या पालकाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याच्या बातम्या याआधीही समोर आल्या होत्या. मात्र पालकही सोबत असल्याने त्यांनाही या त्रासाला सामोरे जावं लागलं आहे. विद्यार्थ्यांसोबत पालक देखील फुटपाथवर झोपून रात्र काढत आहेत. अशातच पुण्यामध्ये एका उमेदवाराच्या पालकाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. आपल्या लाडक्या लेकीला पोलीस होताना पाहायचं स्वप्न घेऊन आलेल्या बापाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.


लेकीला पोलीस भरतीसाठी पुण्यामध्ये घेऊन आलेल्या एका दाम्पत्यावर काळाने घाला घातलेला आहे. ज्योती गवळी नावाची तरुणी अनेक दिवसांपासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती. शेवटी तिला संधी मिळाली आणि पोलीस भरतीसाठी ती वडील सुरेश सखाराम गवळी आणि आईसोबत नाशिकवरुन पुण्यात आली. रविवारी रात्री पुण्यामध्ये उतरल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर परिसरातील फुटपाथवर मुक्काम केला. पहाटे दोनच्या सुमारास ग्राऊंड असल्यामुळे सखाराम गवळी मुलीला भरतीच्या ठिकाणी सोडून आले. 


त्यानंतर शिवाजीनगर परिसरात असलेल्या हॉटेल प्राईडच्या दिशेने चहा पिण्यासाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने सुरेश गवळी यांना उडवलं. या घटनेमध्ये गवळी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनाचा शोध सुरु केला आहे.


दुसरीकडे पोलीस भरतीसाठी आलेल्या अनेक तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक प्रकरणांमध्ये मैदानी चाचणीनंतर तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक तरुण हे ग्रामीण भागातून आल्याचे पाहायला मिळत आहे. भरतीच्या ठिकाणी योग्य सोई सुविधा नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या.