पुणे विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर फुटला; `या` तारखेला पुन्हा होणार परीक्षा
Pune News : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली. पुण्यात पुन्हा एकदा पेपरफुटीची घटना समोर आली आहे. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात येणआऱ्या एमबीएच्या एका विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे.
पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या एमबीएच्या परीक्षेदरम्यान हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्याच्या चिखली येथील डी वाय पाटील कॉलेजमध्ये ही पेपरफुटीची घटना घडल्याचे समोर आलं आहे. सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. येत्या 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12.30 हा फुटलेला पेपर पुन्हा घेतला जाणार आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे सध्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. 22 डिसेंबर रोजी एमबीए प्रथम वर्ष प्रथम सत्रातील लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा होती. मात्र, चिखली येथील डी वाय पाटील येथून प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर विद्यापीठाने ही परीक्षा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे पुणे , अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. ऑक्टोबर 2023 या सत्राची परीक्षा 21 नोव्हेंबर पासून सुरळीतपणे सुरू झाली आहे. त्यात एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा 11 डिसेंबर पासून सुरू झाली आहे. 22 डिसेंबर रोजी एम बी ए 2009 रिवाईज प्रथम सत्रातील लीगल अॅस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा सकाळी 11 वाजता सुरू होणार होती. मात्र त्यापूर्वीच या विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षेचे संवेदनशीलता गोपनीयता व पवित्रता लक्षात घेता विद्यापीठाने पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी पेपर फुटीची घटना समोर आल्यामुळे रद्द करण्यात आलेला पेपर आता येत्या 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12.30 या वेळेत घेतला जाणार आहे.