सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : वाढत्या वयामुळे जेष्ठ नागरिकांना (senior citizen) इतर व्याधींसह मोठ्या आवाजाचाही त्रास होतो. सध्या कोणताही कार्यक्रम असला की हौशी लोक मोठ्या मोठ्या साऊंड सिस्टिम (sound system) लावून आनंद साजरा केला जातो. मात्र या प्रकारामुळे लहानांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा एका मोठ्या आवाजाला वैतागलेल्या जेष्ठ नागरिकाने रागाच्या भरात लाखांमध्ये असलेली साऊंट सिस्टीम फोडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीजेच्या दणदणाटला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने थेट साऊंड सिस्टीम फोडल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. पुण्यातील कोंढवा खुर्द भागात बुधवारी ज्येष्ठ नागरिकाने थेट लग्न समारंभात घुसून साऊंड सिस्टीमची मोडतोड केली आणि तब्बल 10 लाख रुपयांचे नुकसान केले. या सर्व प्रकाराची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर जेष्ठ नागरिकाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सत्यबीर बंगा असे या जेष्ठ नागरिकाचे नाव असल्याचे समोर आले आहे. अब्दुल रिसालदार यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सत्यबीर बंगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढव्यात 8 मार्च रोजी कोरियंटल रिसॉर्ट अँड क्लब या ठिकाणी एक विवाह सोहळा संपन्न होत होता. त्यावेळी मोठ्या आवाजात डीजे सिस्टीम लावण्यात आली होती. सत्यबीर बंगा हे या क्लब पासून थोड्याच अंतरावर राहत आहेत.


विवाह सोहळ्यात सुरु असलेला डीजेचा त्रास होऊ लागल्याने सत्यबीर बंगा यांना राग अनावर झाला. त्यांनी थेट कोरियंटल रिसॉर्ट अँड क्लबमध्ये सुरु असलेल्या विवाह सोहळ्यात थेट प्रवेश केला आणि साऊंड सिस्टीमच्या वायर तोडून टाकल्या. यासोबतच बंगा यांनी एलईडी ऑपरेटरचा लॅपटॉपसुद्धा फोडून टाकला. या सर्व प्रकारात जवळपास 10 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.


दरम्यान, या सर्व प्रकारानंतर बंगा यांच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम ४२७, ४५२ अन्वये अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे बंगा यांनी याआधी देखील रिसॉर्टमध्ये जाऊन अशा कार्यक्रमात गोंधळ घातला असल्याचे समोर आले आहे.