Pune News : शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीने संपवली जीवनयात्रा; कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा
मनसेतून हकालपट्टी केल्यानंतर निलेश माझिरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता माझिरे यांच्या पत्नीने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे
Pune News : मनसेतून (MNS) हकालपट्टी करण्यात आल्यानंतर शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केलेल्या निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांच्या पत्नीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. निलेश माझिरे यांनी गेल्या वर्षी शिंदे गटात प्रवेश केला होता. मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांचे खंदे समर्थक असल्याने बाजूला सारत असल्याने आणि अंतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिलेल्या निलेश माझिरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर माझिरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे माझिरे गेले काही दिवस चर्चेत होते. त्यानंतर आता निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मनसेतून बाहेर पडल्यानंतर निलेश माझिरे यांची बाळासाहेबांची शिवसेना माथाडी जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. बुधवारी माझिरे यांच्या पत्नीने विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे माझिरे यांच्या पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे. माझिरे यांच्या पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली असली तरी टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत कोणता वाद झाला याबाबत माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पदावरुन हकालपट्टी केली होती. मनसे नेते शिरीष सावंत यांनी याबाबतची माहिती दिली होती. माझिरे यांना पदावरून हटवल्याचे पत्र देखील मनसे अधिक़ृत या ट्विटरवरून शेअर करण्यात आले होते. निलेश माझिरे यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यामुळे मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता.