Three Firing Incidents In Pune: पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. पुन्हा एकदा शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. दोन दिवसांत तीनदा गोळीबाराच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पुण्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. क्षुल्लक कारणावरुन या गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका बांधकाम व्यावसायिकावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पिस्तूल रोखून गोळीबार केल्याचा प्रयत्न केला. तर, शेवाळवाडी परिसरात निवृत्त लष्करी जवानाने एकावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या दोन घटनांमुळं वातावरण गंभीर असतानाच आणखी एक गोळीबाराची घटना घडली आहे. सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी एका तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. 


सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भूमकर चौक परिसरात गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एका तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गणेश गायकवाड असे जखमी तरुणाचे नाव आहे. काडीपेटी मागितल्याच्या कारणातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 


पहिली घटना


जंगली महाराज रस्त्यावर एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. प्रसिद्ध फुड डिलिव्हरी अॅपचा ड्रेसकोड परिधान करुन आलेल्या दोघांनी बांधकाम व्यावसायिक धीरज दिनेशचंद्र आरगडे यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी दोन वेळा फायर केले मात्र फायर झाले नाही. त्यानंतर अरगडे यांनी आरडा ओरडा केल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. मंगळवारी ही घटना घडली होती. 


दुसरी घटना


 व्यवसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसर्‍या माजी सैनिकावर पिस्तूलातून गोळ्या (Firing Incidents) झाडल्या. जयवंत बापुराव खलाटे (वय.53,रा. भेकराईनगर) असे गोळीबारात जखमी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. बुधवारी ही घटना घडली आहे. 


दरम्यान, सलग तीन दिवस पुणे शहरात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी गुंडांची झाडझडती घेतली होती. मात्र त्यानंतरही अशा घटना होत असताना कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.