सागर आव्हाड, झी मीडिया पुणे : दौंड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुणांमध्ये एकाच कुटुंबातील दोन भाऊ आहेत.  आसरार अलीम काझी (वय २१ वर्षे) , अतिक उझजमा फरीद शेख( वय. २० वर्षे) करीम अब्दुल हादी फरीद काझी (वय.२० वर्षे) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
दौंड शहरातील नवगिरे वस्ती इथे राहणारे तीन मित्र रविवारी ६ मार्चला दुपारी चार वाजात दुचाकी घेऊन फिरण्यासाठी घराबाहेर पडले. पण रात्र झाली तरी ते घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध सुरु केला.


मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघंही नरपालिकेच्या पाणी साठवण तलावाजवळ फोटोशुटसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घरच्यांनी या परिसरात शोध घेतला असता तलावाशेजारी या मुलांची दुचाकी, कपडे आणि बॅग आढळली. पालकांना शंका आल्याने त्यांनी दौंड पोलिसांशी संपर्क साधला. 


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलांचा शोध सुरु केला. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तलावात शोध घेण्यात आला. रात्री उशीरा या तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मुलांचे मृतदेह पाहताच पालकांनी टाहो फोडला.


मृत तरुणांपैकी असरार हा बीए उत्तीर्ण होता, तर करीम आणि अतिक हे दोघेही कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेत होते. तिघा मित्रांच्या दुर्देवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.