पुण्यातील विचित्र घटना! जेवण वाढताना ताट, तांब्या आपटल्याने वाद; नवरा थेट रुग्णालयात दाखल
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. पती-पत्नीच्या वादातून पतीने पतीवर थेट चाकूने हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Pune Crime News Today: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. मध्यंतरीच्या काळात कोयता गँगने दहशत माजवली होती. तर, आत्ताही पुण्यात खून आणि हत्याच्या घटनांनी हादरलेले आहे. अशातच अलीकडेच एका घरगुती भांडणातून पत्नीने थेट पतीवर चाकूने वार केले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जेवण वाढताना वाद झाल्यामुळं महिलेकडून पतीवर चाकूने वार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चक्क चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया रमेश ससाणे (वय ३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर, या बाबत तिचा पती रमेश बबन ससाणे (वय ४३) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
काय घडलं नेमकं?
रविवारी रमेश ससाणे कामावरुन घरी जेवण करण्यासाठी आले होते. त्यावेळी जयाने त्यांच्याकडे ५०० रुपये मागितले. मात्र रमेश यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग जया यांना आला. पैसे न दिल्याने त्या दोघांच्यात वाद झाले. त्यानंतर जया हिने जेवण वाढताना ताट आणि तांब्या जोरात आपटला. यावरुन रमेश यांनी तिला चापट मारली. रमेश यांनी मारल्याच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या जयाने रमेश यांच्या दंडावर आणि पाठीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. तर, या प्रकरणी त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पती-पत्नीतील क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादाने भयंकर रुप घेतल्याने शेजाऱ्या-पाजऱ्यांमध्येही एकच चर्चा रंगली आहे. या प्रकरणी सहायक फौजदार भोसले तपास करत आहेत.
पुण्यात पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या
पुण्यात पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे तर, पत्नीच्या हत्येनंतर पतीने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. पुण्यातील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरातील ही घटना आहे. सोमनाथ सखाराम वाघ आणि पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ अशी मृतांची नावे आहेत. या घटनेचे कारण मात्र अद्याप समजले नाहीये.