पुण्यात चाललंय काय? IT कंपनीतील तरुणीवर कोयत्याने हल्ला, आर्थिक वादातून तरुणीची हत्या
Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक वादातून एका तरुणाने त्याच्याच सहकाऱ्यावर हल्ला केला आहे.
Pune Crime News: पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्ह्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. येरवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेवर कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्यामुळं तरुणीचा मृत्यू झाला आहे. आरोपी हा तिच्याच कंपनीतील सहकारी असून एका क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याने सांगण्यात येत आहे.
मयत तरुणी पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजनगर भागात राहण्यास आहे. ती येरवडा येथील नामांकित आयटी कंपनीत कामाला आहे. या प्रकरणी त्याच कंपनीत काम करणारा तिचा मित्र - कृष्णा सत्यनारायण कनोजा याला पोलिसांनी अटक केली आहे. याला येरवडा पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा आणि तरुणी एकाच कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास तरुणी काम संपवून वाहनतळावर आली. त्यावेळी तिथे असलेल्या कृष्णाने तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की त्याने तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. तरुणीने आरडाओरडा केल्याने तिथले सुरक्षारक्षक आले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळवण्यात आली.
आरोपीने आर्थिक वादातून तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. वाद विवादावरून धारदार हत्याराने तिच्या उजव्या कोपरावर वार करून गंभीर जखमी झाले होते. आरोपीने कोयता लपवून आणला होता. त्यामुळं कोयता कोणाकडून आणला याची चौकशी सुरू केली आहे.
पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याची दहशत
पुण्यात परिसरात टोळक्याने तरुणाच्या हाताचा पंजा कोयत्याने तोडला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिबवेवाडीमध्ये कोयत्याने दोन जणांवर जीवघेणा हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार सोमवारी संध्याकाळी ४.३० वाजता घडला. फिर्यादी आणि त्याचा मित्र पीयूष यांना आरोपींनी भेटायला बोलावले होते. पूर्वी त्यांच्यात वाद झाल्याने या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या मध्ये पीयूष याच्या हातावर आरोपींनी कोयता मारला ज्यामध्ये त्याचा हाताचा पंजा खाली पडला आणि पीयूष गंभीर जखमी झाला. इतकंच नाही तर पीयूषच्या हातावर आणि मांडीवर सुद्धा आरोपींनी कोयत्याने वार केले. घटनेनंतर दोघा जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले गेले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पीयूष याचा हाताचा पंजा जोडायचा प्रयत्न सुद्धा केला आहे.