Pune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण सध्या सर्वसामान्यांसह राजकारण्यांमध्येही चर्चेचा विषय आहे. याचं कारण या प्रकरणात पोलीस दिरंगाई आणि निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. पोलीस पहिल्या दिवसापासून कायदेशीर मार्गाने कारवाई करत आहेत असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसंच पोलिसांनी आतापर्यंत काय पावलं उचलली आहेत हेदेखील सांगितलं. 


प्रौढ म्हणून कारवाई कऱण्याची पोलिसांची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आम्ही 304 सह संबंधित कलमांतर्गत गुन्हे दाखल करत कोर्टात एक अर्ज दाखल केला होता. चालकाला प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं असं आम्ही अर्जात सांगितलं होतं. कोर्टाने हा अर्ज फेटाळला होता. त्यावर आम्ही जिल्हा न्यायालयात अपील केली आहे. आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे. आमची पूर्ण ताकदीने कायदेशीर लढण्याची तयारी आहे," असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. 



5 जणांना अटक


"वडिल आणि पब, बारचे मॅनेजमेंट, मॅनेजर्स अशा एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिघांना रात्री अटक करण्यात आली असून, त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. वडील आणि आणखी एका आरोपीला आता ताब्यात घेतलं असून ट्रान्झिटने आणत आहोत. यानंतर अटकेची कारवाई कऱण्यात येईल आणि उद्या त्यांना कोर्टात हजर करणार आहोत. पुराव्यांच्या दृष्टीकोनातून जे काही करणं गरजेचं आहे त्यासाठी विशेष पथक आधीच नेमण्यात आलं आहे. ते युद्धपातळीवर सर्स सीसीटीव्ही, ऑनलाइन पेमेंट्स याची माहिती घेत आहे," अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. 


'मद्यप्राशन केलं हे सीसीटीव्हीतून उघड, मात्र ब्लड रिपोर्टची वाट पाहतोय'


"कोणताही निगेटिव्ह ब्लड रिपोर्ट आलेला नाही. ब्लड रिपोर्ट पाठवण्यात आला आहे. ब्लडचे रिपोर्ट आम्हाला अद्याप प्राप्त झालेले नाहीत. दोन ठिकाणी ब्लड सँपल घेण्यात आले आहेत जेणेकरुन संभ्रम राहू नये. जी काही वस्तुस्थिती असेल ती ब्लड रिपोर्टमधून समोर येईल. त्याबाबत संभ्रम असण्याचं कारण नाही. पुराव्यांच्या दृष्टीकोनातून आरोपी सीसीटीव्हीत मद्यप्राशन करताना दिसत आहे. त्याने एके ठिकाणी ऑनलाइन पेमेंट केलं आहे. त्याची बिलंही आहेत. पुराव्यांनुसार ते दारु प्यायले असून, ब्लड रिपोर्टनंतर त्याबाबत खुलासा होईल," असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट सांगितलं आहे. 
 


कोर्टात 2 अर्ज


"रविवारी आम्ही कोर्टात दोन अर्ज दिले होते. एका अर्जात हा फार गंभीर गुन्हा असून 304 कलमांतर्गंत 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असल्याने बाल न्याय कायद्याअंतर्गत गंभीर आहे. त्याचं वय 16 पेक्षा जास्त असल्याने प्रौढ म्हणून खटला चालवण्याची कायद्यात तरतूद आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. एका निमुळत्या रस्त्यावर मद्य पिऊन वेगाने गाडी चालवत होता. त्यामुळे हा गंभीर गुन्हा आहे. याशिवाय आणखी एक अर्ज करण्यात आला होता. जोपर्यंत या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत 14 दिवसांच्या रिमांड होममध्ये पाठवण्यात यावं असं आम्ही म्हटलं होतं. पण हे दोन्ही अर्ज फेटाळण्यात आले. चाईल्ड केअर होमला पाठवण्याची विनंती अमान्य करताना कोर्टाने 2 पानांची ऑर्डर दिली आहे," असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.