पुणे पोलीस अॅक्शन मोडवर ! गजा मारणे, बाबा बोडके, घायवळ यांच्यासह 250 कुख्यात गुंडांची परेड
Pune Police News: गजानन मारणे, निलेश घायवळ यासह पुण्यातील इतर गुंडांच्या टोळीतील प्रमुख मोरक्यासह इतर सदस्यांची परेड पुणे पोलिस आयुक्तांनी घेतली आहे.
Pune Police: विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयातील गुंडाचा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांवर व सरकारवर टीका केली होती. हा व्हिडिओ व्हायरल होताच राजकारणात एकच खळबळ उडाली होती. पुण्यातल्या गुन्हेगारांच्या टोळीप्रमुखांचे फोटो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारांच्या टोळी प्रमुखांची आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांची आज पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात परेड घेण्यात आली.
पुण्यातल्या गुन्हेगारांनी आज पोलीस आयुक्त कार्यालयात हजेरी लावली आहे. गजानन मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ याच्यासह इतर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आज पुणे पोलिसांनी परेड घेतली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व गुन्हेगारांना आज आयुक्तालयात बोलवले होते.
पुणे पोलीस आयुक्तालयात आज 200 ते 300 गुन्हेगारांची आज हजेरी घेण्यात आली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेली या कारवाईची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. पुण्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त स्वतःच गुंडांना तंबी देणार आहेत, अशी चर्चा आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ताकिदच पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणे यांची भेट घेतली होती. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले होते. त्याचबरोबर, विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनीही सरकारवर टीका केली होती.
विजय वडेट्टीवार यांची टिका
विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत निलेश घायवळसह काही जण मंत्रालयात फिरताना दिसत आहेत. या व्हिडिओला रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाचं गाण लावलं आहे. रिलसाठी मंत्रालयात परिसरात व्हिडिओ शूट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे, गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. तसंच हीच का ती "मोदी की गॅरंटी"? असा सवाल केला आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहेत. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांचे ट्विट
संजय राऊत यांनीही एक फोटो ट्विट करत एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली आहे. महाराष्ट्रात गुंडा राज. गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य. हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.