Pune Porsche Accident Case Uddhav Thackeray Group Demad: "पुण्यातील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरण दाबून टाकण्यासाठी सत्ताधारी आणि सरकारी यंत्रणा किती भयंकर प्रताप करीत आहे, हे रोज चव्हाट्यावर येत आहे," असं म्हणत ठाकरे गटाने पुणे पोर्शे अपघात प्रकरणामध्ये थेट राज्य सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणातील ‘अप्रत्यक्ष सह-आरोपीं’चे शेपूट आणखी बरेच लांबू शकते, अशी शक्यताही आरोपी डॉक्टरच्या विधानाचा संदर्भ देत ठाकरे गटाने म्हटलं आहे. 


आरोपींना वाचविण्याचा आटापिटा करणारी सरकारी-पोलीस यंत्रणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"पुणे अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी बिल्डर पुत्राच्या रक्ताच्या नमुन्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी फेरफार केल्याचा आणि ते नमुने थेट कचरा कुंडीत फेकून दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेले नाही. अटकेत असलेल्या डॉ. तावरे याने ‘मी सगळ्यांची नावे जाहीर करीन’ अशी धमकीच दिली आहे. स्वतः आरोपी असलेला डॉ. तावरे एवढ्या खुलेपणाने धमकी देतो म्हणजेच या प्रकरणातील ‘अप्रत्यक्ष सह-आरोपीं’चे शेपूट आणखी बरेच लांबू शकते. असाच या धमकीचा अर्थ आहे. या प्रकरणातील आरोपी असोत, त्यांना वाचविण्याचा आटापिटा करणारी सरकारी-पोलीस यंत्रणा असो की या सगळ्यांचे सत्तेच्या पडद्यामागचे सूत्रधार, ही सगळी मंडळी भ्रष्टच नाहीत, तर ‘रक्तालाही चटावलेली’ आहेत. आरोपीच्या रक्ताचे नमुने कचरा कुंडीत फेकणाऱ्यांना दुसरे काय म्हणणार?" असा घणाघात 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.


आरोग्य विभाग भ्रष्टाचार आणि खाबूगिरीच्या आरोपांनी पुरता बदनाम


"पुण्याचे ससून रुग्णालय हे ‘गुन्हेगारांना वाचविणारा अड्डा’ बनले आहे आणि राज्याचा आरोग्य विभाग भ्रष्टाचार आणि खाबूगिरीच्या आरोपांनी पुरता बदनाम झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेचे निलंबित आरोग्य विभागप्रमुख डॉ. भगवान पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्याच्या आरोग्य विभागातील भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली होती. डॉ. पवार यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, “नियमबाह्य टेंडर काढण्यास नकार दिल्यानेच आपले निलंबन करण्यात आले आहे. नियमबाह्य टेंडरिंग, खरेदीची कामे आणि इतर कामांसाठी मंत्रीमहोदयांनी आपल्याला कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून आपल्यावर दबाव आणला होता.’’ डॉ. पवार यांनी पत्रात कोणाचा नामोल्लेख केलेला नाही. तथापि, त्यांचा रोख राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडेच आहे, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.


नक्की वाचा >> Pune Porsche Accident: 'अजित पवारांचा फोन जप्त करा आणि..', पुण्याच्या पालकमंत्र्यांना 5 प्रश्न विचारत आरोप


आरोग्य मंत्र्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही


"जनतेचे आरोग्य सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागावर असते. मात्र विद्यमान आरोग्य मंत्र्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही. अनियमित बदल्या-बढत्या आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढाल हा आरोग्य विभागातील मोठा उद्योग बनला आहे. महात्मा जोतिराव फुले योजनेतील बेकायदेशीर कामांवरून आरोप झाले. रुग्णवाहिका खरेदीमध्ये 6 हजार कोटींचा घोटाळा, कंत्राटी कामगार भरतीच्या नावाखाली 3200 कोटी रुपयांच्या ‘टेंडर’ची खाबूगिरी, असे आरोग्य खात्याच्या भ्रष्ट कारभाराचे नमुने आतापर्यंत बाहेर आले आहेत. त्यात ससून रुग्णालयातील अमानुष भ्रष्टाचाराची भर पडली," असं ठाकरे गटाने म्हटलंय.


नक्की वाचा >> Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत


सरकारलाच आरोपी करा


"पुणे ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणाने ससून रुग्णालय किंवा आरोग्य विभागच नव्हे, तर राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’ भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. तपासातील सुरुवातीपासूनचे गडबड-घोटाळे, त्यातील राजकीय हस्तक्षेपांची झालेली पोलखोल, आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकण्याचा प्रकार आणि या प्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीची सूत्रे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याकडेच सोपविणे हे सगळेच भयंकर आहे. गुन्हा केल्याने आरोपी तर गुन्हेगार आहेतच, परंतु त्यांच्या बचावासाठी आटापिटा करणारी सरकारी यंत्रणा आणि सरकारमधील त्यांचे पोशिंदेदेखील गुन्हेगारच ठरतात. मिलॉर्ड, या प्रकरणात सरकारलाच आरोपी करा," असं ठाकरे गटाने लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.