Pune Porsche Accident Sunil Tingre Recommendation Letter For Ajay Taware: कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनी फेरफार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही डॉक्टरांना रविवारी रात्री उशीरा अटक केली. तसेच सोमवारी पोलिसांनी ससून रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळेला अटक केली. या तिघांच्या अटकेनंतर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात वडगावशेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी डॉ. अजय तावरेंसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना शिफारस पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. आता याच पत्रासंदर्भात टिंगरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे टिंगरे तेच आमदार आहेत जे 19 मे रोजी कल्याणी नगरमध्ये अपघात झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर पोलीस स्टेशनमध्ये पोहचले होते.
तावरे यांची ससूनच्या अधीक्षक पदी नियुक्ती करावी यासाठी टिंगरेंनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना 26 डिसेंबर 2023 रोजी पत्र लिहिलं होतं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजुरी देत या पत्रावर तावरेंना अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश दिले होते. आता हेच पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या पत्रामध्ये विषय 'डॉ. अजय तावरे यांच्याकडे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरीक्त कार्यभार देणेबाबत' असा लिहिला आहे.
टिंगरेंनी मुश्रीफ यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये , "उपरोक्त विषयान्वये माझ्या परिचयाचे डॉ. अजय तावरे हे पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख आहेत. यापूर्वी ससून सर्वोपचार रुग्णालयात त्यांनी वैद्यकीय अधीक्षक पदावर कोविड 19 च्या काळात उत्तम कर्तव्य पार पाडलेले आहे. तरी डॉ. अजय तावरे यांच्याकडे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देणेबाबत आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करावी ही विनंती," असा मजकूर आहे.
तावरेंना सोमवारी म्हणजेच 27 मे 2024 रोजी अटक झाल्यानंतर टिंगरेंचं हे पत्र चांगलेच व्हायरल झाले. यानंतर सायंकाळी प्रसारमाध्यमांनी टिंगरेंनी एक निवेदन जारी करत आपली बाजू मांडली. "आज माझ्या शिफारस पत्रावरून ज्या बातम्या सुरू आहेत त्यावरून या विषयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते," असं टिंगरे म्हणाले आहेत.
"वास्तविक मी लोकप्रतिनिधी असल्याने अनेक जण माझ्याकडे शिफारसपत्र घेण्यासाठी येत असतात. यामध्ये शाळा प्रवेश, वैद्यकीय उपचार, विनंती बदली आणि इतर अनेक कारणांसाठी शिफारस पत्रे नागरिकांकडून मागितली जातात. तसंच प्रत्येक शिफारस पत्राच्या खाली कायदेशीर बाबींची पूर्तता करून योग्य ती कार्यवाही करावी, असा उल्लेख असतो. त्यामुळे योग्य बाब असेल तरच संबंधित विभागाकडून कार्यवाही होत असते. त्यामुळे या विषयाला वेगळं वळण देणं योग्य ठरणार नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून चौकशीअंती ही बाब स्पष्ट होईल," असं टिंगरे म्हणाले आहेत.
नक्की वाचा >> 'पुण्यातील ससून रुग्णालय 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' आहे का? आधी ललित पाटील, आता डॉक्टरांनी..'
दरम्यान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. देशपांडे यांनी अटकेत असलेल्या ससूनमधील दोन्ही डॉक्टर आणि एका शिपायाला 30 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.