Pune Rain : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार, PMC चं नागरिकांना आवाहन
Pune Rainfall Update : एकीकडे पुण्यात 32 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असताना आता नदीपात्रातील गावांना धोका निर्माण झाला आहे.
Pune Rain News : पुणे जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. हवामान विभागानं येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे शिरूर, भोर, वेल्हा, मावळ मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलीये. तर दुसरीकडे मुळा मुठा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा पाण्याचा विसर्ग आज सायंकाळी 6 वाजता वाढवण्यात येणार असून नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आलं आहे. पुण्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
पुणे शहर आणि परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
दरम्यान, पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होणे टाळण्यासाठी पुणे महापालिकामार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी इमारतींमधील जमिनीखाली व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करावी. तसेच, घरगुती वापरासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून घ्यावे, असं आवाहन देखील पुणे महानगरपालिकेने केलं आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगावातील वाड्यांवर दरडीचा धोका निर्माण झालाय. आसाने इथल्या जांभळेवाडीच्या बाजूला असणा-या डोंगराचा काही भाग रात्री खचल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कुंभेवाडीत रस्त्यावर दरड कोसळल्यानं तीन वाड्यांचा संपर्क तुटलाय. या भागात वीज नसल्यानं नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ आलीये.