हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेत्या आणि जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांची शिवसेनेतून आज हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीत पक्ष विरोधी काम केल्याने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आशाताई बुचके यांनी 2014 साली शिवसेनेकडून जुन्नर विधानसभेची निवडणूक लढवली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकी पूर्वी शिवसेना पक्षात प्रवेश केला तेव्हा आशाताई बुचके यांनी मातोश्रीवर जावून सोनवणेंच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता. सोनावणे पक्षात आल्यानंतर बुचके यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. 


बुचके यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून पाठवण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. अगदी काही दिवसांवर विधानसभा निवडणूका येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात आशाताई बुचके आता कोणत्या पक्षात जातात. हे पाहावं लागेल. 


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिवसेनेनं काही बदल करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातलं शिवसेनेचं शहरप्रमुखपद रद्द केलं गेलं आहे. महापालिकेतला गटनेताही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.