सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : मोबाईल हॅक झाल्याचं, वेबसाईट हॅक इतकंच नाही तर बॅक अकाऊंच हॅक झाल्याच्या घटनांबद्दल तुम्ही ऐकलं असेल...पण कधी मेंदू हॅक झाल्याचं ऐकलंय का? नसेलच ऐकलं...पण अशी घटना घडलीये. ही घटना इतर दुसऱ्या कोणत्या ठिकाणी नाही तर पुण्यात घडली आहे. हे एवढ्यावरच थांबलं नसून मेंदू हॅक झाल्याची घटना थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात काय घडेल हे सांगता येत नाही हे खरं आहे. एका महिलेने मेंदू हॅक केल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे केल्याची घटना आता समोर आली आहे. या घटनने पोलीस चक्रावलेत. पुण्यात सध्या अभासी जगात पाळत ठेवल्याच्या तक्रारी वाढल्यात त्यातूनच आता मेंदू हॅक झाल्याचे म्हणजेच आपल्याला कोणी तरी कंट्रोल करत असल्याची तक्रार समोर आलीये. 


पुण्यातील एका नामांकित लष्करी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या 38 वर्षीय महिलेला तिचा मेंदू कोणीतरी हॅक केला असून तिच्या मनात जे विचार येतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कृती घडत असल्याचं जाणवू लागलंय. त्यामुळे तिने सायबर पोलीस स्टेशन गाठत स्वत:ची कैफियत मांडली. पोलिसांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून अशाच प्रकारच्या माइंड हॅकिंगच्या वाढत्या तक्रारी येऊ लागल्याने सायबर पोलिस चक्रावले आहेत.


अशाच काहीशा घटना यापूर्वी देखील समोर आल्या आहेत. 25 वर्षीय एका उच्चशिक्षित तरुणाची पबजी गेम खेळताना ऑनलाइन एका तरुणीशी ओळख झाली. २ महिने संपर्कात राहिल्यानंतर तिच्याशी बोलणं बंद झालं. परंतु त्यानंतर तिचा फोटो मोबाइल स्क्रीनवर सातत्याने दिसतो, ती वारंवार त्रास देते असे भास तरुणाला होऊ लागले आणि त्याने याबाबत पोलिसांकडे धाव घेत याचा तपास करा अशी मागणी लावून धरली. 


माझा मोबाइल कोणीतरी हॅक केला, माझा सातत्याने पाठलाग होतोय, डोक्यात जे विचार येतात ते कोणीतरी ऐकतं अशा तक्रारी केल्या. परंतु अशा प्रकारात लेखी तक्रार द्या असं पोलिसांनी सांगताच नेमके कोणते मुद्दे तक्रारीत द्यावं हे तरुणास समजेना झाले. यादरम्यान पोलिसांनी तरुणाचा फोन, फेसबुक तपासून पाहिलं तर तो हॅक केला नसल्याचेही स्पष्ट झालं. 


अशीच एक घटना समोर आली म्हणजे कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला त्याची पत्नी मोबाइलवर काही मेसेज करत असेल तर ते ऑफिसमधील इतरांना आपोआप समजतात. माझ्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहेत, माझं कोणाला चांगलं बघवत नाही असे, भास होऊ लागले आणि त्याने पोलिसांकडे दाद मागितली.


भ्रमाशी निगडित आजार


मानसशास्त्रामध्ये व्यक्तीच्या अविवेकी विचारांशी संबंधित भ्रम (डेल्युजन) हा प्रकार असतो. त्यामध्ये स्वतःच्या कुटुंबातील ओळखीचे लोकं, शेजारी, सोसायटीमधील लोकं किंवा त्याच्याशी संबंधित असणारे लोकं त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने इजा पोहोचवण्याचा किंवा नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करते असे त्या व्यक्तीस वाटत असतं.