पुणे : पुण्यातील पुरंदर विद्यापीठ हे तीन खोल्यांचे असून इथे बोगस पदव्या दिल्या जात असल्याचे वारंवार उघड झाले आहे.  या विद्यापीठाला युजीसीची किंवा राज्य सरकारची मान्यता नसल्याचेही उघड असूनही यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न विचारला जात आहे. राज्यातील शिक्षण खाते याकडे लक्ष देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


तीन खोल्यांचे विद्यापीठ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात सासवड बसस्थानकासमोरील एका व्यावसायिक इमारतीवर पुरंदर विद्यापीठ हा फलक दिसतो. या विद्यापीठाचा शोध घेतला असता चौथ्या मजल्यावर आपण जाऊन पोहोचतो. केवळ तीन वर्गखोल्या, एक केबीन, कोणत्याही शैक्षणिक सुविधा नाहीत.


पदव्या वाटल्या जातात


तरीही २००७ पासून बिनदिक्कतपणे विविध अभ्यासक्रम राबवले जात आहेत. तीन खोल्यांमध्ये अवघं विश्वविद्यालय चालवलं जातंय. एवढंच नाहीत तर इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्याही वाटल्या जातात. 


तरीही अभ्यासक्रम सुरूच


या तीन खोल्यांच्या कथित विद्यापीठात बीए, बीकॉम, बीएससी, बीई, डीप्लोमा एमबीए असे अनेक अभ्यासक्रम चालवले जातात. मात्र या अभ्यासक्रमांसाठी कोणतीही आवश्यक सुविधा नाही. तंत्र शिक्षणासाठी एआयसीटीईची मान्यताही नाही.


अजब दावा


हे सगळं या बोगस विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष दादा जगताप यांनाही मान्य आहे. मात्र हे विद्यापीठ नाही तर महाविद्यालय आहे. त्यामुळे कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही असा अजब दावा त्यांनी केलाय. 


कारवाई होणार ?


याविरोधात झालेल्या तक्रारीनंतर आता उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली. मात्र चौकशीला कोणी हजरच राहीले नाहीत. आता या संस्थेवर काय कारवाई करायची याचा निर्णय शासनच घेणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने सांगितलंय.


बोगस पदव्यांचे विद्यापीठ 


पुरंदर विद्यापीठातून आजवर हजारो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडलेत. सध्या इथे २०० ते २५० विद्यार्थी शिकत आहेत. मात्र हे विद्यापीठ आणि पदव्या बोगस असल्याने विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होतंय. शिक्षण खातं आता पुरंदर विद्यापीठाबाबत काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलंय.