नाशिक : महापालिकेची महासभा चांगलीच वादळी ठरली. परिवहन समिती ऐवजी कंपनी करण्याचा विषय ऐनवेळी सभागृहात आल्याने महासभेत प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना भिडल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला होता. नाशिक महापालिकेतर्फे शहरात बससेवेसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय, यापूर्वी झालेल्या महासभेत घेण्यात आला होता. मात्र समिती करण्याचा निर्णय झाला असताना सत्ताधारी भाजपाने ऐनवेळी समिती ऐवजी कंपनी करण्याचा निर्णय इतिवृत्तात केल्याने, विरोधकांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला. 


थेट महापौरांनाच घेराव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी विरोधकांनी थेट महापौरांनाच घेराव घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृत गोंधळ निर्माण झाला. महासभेच्या सुरवातीलाच झालेल्या या गोंधळा नंतर महापौंरानी गोंधळातच सर्व विषय मंजूर केले. त्यामुळे पालेकतील कारभारी दडपशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.


नगरसेवकच एकमेकांमध्ये भिडले


गोंधळात महासभा आटोपल्यानंतर विरोधी पक्षातील नगरसेवकच एकमेकांमध्ये भिडले. सभागृहात घातलेला गोंधळ मॅनेज असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेविका हेमलता पाटील यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांच्यावर केला. त्यानंतर हे दोन नगरसेवक भर सभागृहातच एकमेकांवर धावून गेल्यानं तणाव निर्माण झाला.


सभागृहात असभ्य पद्धतीने टीका


राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांनी सभागृहात असभ्य पद्धतीने टीका केल्याचा आरोप काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी केला. शेलार यांच्या कृत्याविरोधात पोलीस आयुक्तांना भेटणार असल्याचं त्या म्हणाल्या. नाशिक महापालिका सभागृहातल्या गोंधळानंतर पालिकेत दिवसभर तणावाचे वातावरण होते. त्यामुळे या महासभेतील सर्व विषय पुढील महासभेत घेण्यात यावे अशी मागणी विरोधकांनी केली.