मुंबई / औरंगाबाद / नांदेड : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी योगी आदित्यनाथ यांचा पुतळाही जाळण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी योगी सरकार आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा गडचिरोली युवक काँग्रेस कडून निषेध करण्यात आलाय.  युवक काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदविण्यात आला.


'दडपशाहीचा लाजिरवाणा नमुना'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा कृषी आणि सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी निषेध केला. काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेली मारहाण म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीचा लाजिरवाणा नमुना आहे, अशी टीका त्यांनी केला.  दलित आणि मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींना अटकाव करणं म्हणजे लोकशाही मुल्यांची दिवसाढवळ्या हत्या असल्याचं त्यांनी म्हटले आहे. 


प्रत्येक गोष्टीवर बोलणारे मूग गिळून गप्प - अमोल कोल्हे


उत्तर प्रदेशात झालेल्या पीडितेच्या अत्याचार प्रकरणात देशभरात संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या दोन्ही घटना म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली. उत्तर प्रदेश सरकारची ही दडपशाही असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एरवी प्रत्येक गोष्टीवर बोलणारे भाजप नेते यावेळी मूग गिळून गप्प असल्याची कोपरखळी कोल्हे यांनी लगावली. 


चंद्रपूर येथे जोरदार निषेध


खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा चंद्रपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. स्थानिक गांधी चौकात झालेल्या नारेबाजी आंदोलनात स्वतः पालकमंत्री विजय वडेट्टीवार- खासदार बाळू धानोरकर -आमदार प्रतिभा धानोरकर व शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक  पुतळ्याचे दहन केले. भाजप सरकारने राहुल गांधींना रोखल्यास देशाच्या प्रत्येक घरातून गांधी निघेल अशी प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. 


योगी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न


औरंगाबादेत राहुल गांधी यांच्या अटकेविरोधात काँग्रेसने निदर्शने केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांत  धक्काबुक्की झाली. कार्यकर्ते पुढे आणि पोलीस त्यांना पकडण्यासाठी मागे मागे असं चित्र औरंगाबादच्या  क्रांती चौकात दिसलं. 


अहमदनगर येथे रास्ता रोकोचा प्रयत्न


उत्तर प्रदेशात राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. शहरातील दिल्ली गेट परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र पोलीस आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. 


काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या विरोधात महामारी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील इकोटेक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह १५३ कार्यकर्ते आणि ५० इतर लोकांवर १५५/२०२०, १८८, २६९, २७० आयपीसी आणि ३ महामारी अ‍ॅक्ट अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.