प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : अलिबागमधून (Alibag News) अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. कबड्डी सामना (Kabaddi Match) सुरु असतानाच प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी बांधण्यात आलेली प्रेक्षक गॅलरी अचानाक कोसळ्याने मोठा अपघाता झाला आहे. सामना पहात असलेले सर्वच जण अचानक प्रेक्षक गॅलरीसह कोसळ्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या अपघातामध्ये चारजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींन रुग्णालयात दाखल केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबाग तालुक्यातील गरुडपाडा येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी  रात्री 10.30 वाजण्याच्या दरम्यान, कबड्डी स्पर्धेसाठी उभारलेली तात्पुरती गॅलरी अचानक कोसळल्याने मोठा गोंधळ उडाला होता. प्रेक्षक गॅलरी कोसळून चौघेजण जखमी झाले. यातील तिघांना सरकारी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले तर एकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कबड्डी स्पर्धा पाहायला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी झाली होती. त्याचवेळी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेली लोखंडी प्रेक्षक गॅलरी कोसळली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओदेखील आता समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरुडपाडा येथे कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी गर्दी केली होती. शेकडो प्रेक्षक बसतील अशी तात्पुरती प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली होती. प्रेक्षक कबड्डीच्या सामन्याचा थरार पाहत असतानाच अचानक लोखंडी प्रेक्षक गॅलरी जोरात कोसळली. यामध्ये चारजण जखमी झाले. अपघातात दोघांना किरकोळ तर आणखी दोघांना गंभीर दुखापत झाली. चौघांवर अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करुन तिघांना घरी पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर एकाला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


नाशिकमध्ये शिवशाही बसच्या चाकाखाली चिरडून एक जण जागीच ठार


सिन्नर येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर शिवशाही बसच्या चाकाखाली चिरडून तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. विजय नामदेव मोरे (42, रा. सातपीरगल्ली, सिन्नर) असे मृताचे नाव आहे.पालघर डेपोची शिर्डी-पालघर ही शिवशाही बस शिर्डीहून आल्यानंतर बसस्थानकात जात असताना ही घटना घडली. विजय मोरे हा बसस्थानकातून पायी बाहेर पडत होता. त्याचवेळी बसच्या पुढच्या मागील चाकाखाली तो सापडला असता ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बस थांबविली. मात्र डोक्यावरुन चाक गेल्याने विजय यांचा मृत्यू झाला होता.