अलिबाग : रायगडच्या महाड तालुक्यात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना महाड पंचायत समिती कार्यालयात धक्कादायक बाब उघड झाली आहे. मंगळवारी दुपारी येथील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी चक्क मटणाच्या जेवणावर ताव मारला. याचीच चर्चा तालुका आणि जिल्ह्यात रंगत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाड पंचायत समिती कार्यालयातील बाळासाहेब ठाकरे सभागृह आणि सभापतींच्या दालनात  या मटणाच्या पंगती उठल्या. याचे वृत्त बाहेर पडताच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिले आहे. ही पार्टी चक्क मिटिंगच्या नावाखाली आयोजित केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे आता कोणावर कारवाई होणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


कोरोनाचे संकट असताना गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात पार्टी कशी आयोजित करतात, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अधिकारी वर्गावर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींवर काय कारवाई होणार याचाही चर्चा सुरु झाली आहे. समाजमाध्यमांतून या पार्टीबाबत संताप व्यक्त होत आहे.