Mumbai Goa highway : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मनसे (MNS) मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावरुन आक्रमक झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने या रस्त्याच्या कामाची पाहणी सुरू ठेवली आहे. मात्र आता या बांधकामाच्या दर्जाबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. चिपळूणमध्ये (Chiplun) मुंबई गोवा महामार्गावच्या उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याने खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावरच्या उड्डाण पुलाचा भाग तुटला आहे. चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावरील पुलाचा भाग मधोमध तुटल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी आठ वाजता पुलाचा भाग मधोमध तुटल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समोर आलं आहे. मात्र बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग मधोमध तुटल्याने त्याच्या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.



मुंबई-गोवा महामार्गाचं काम जरी सध्या वेगात सुरू असलं तरी ते अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत आहे, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सातत्याने केला जात आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनीहीमुंबई-गोवा महामार्गाची पाहणी पायी जाऊन पाहणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं वेगात काम सुरु केलं होतं. मात्र आता मुंबई गोवा महामार्गावर कोणत्या दर्जाचं काम होतंय याचा प्रत्यय लोकांना देखील आला आहे.


पूल दुर्घटनाप्रकरणात सेफ्टी इंजिनिअरला मारहाण


मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथे नवीनच उड्डाणपुलाच काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम बोगस असल्याचा आरोप अनेक वेळा येथील स्थानिक नागरिकांनी केला. मात्र अद्यापही प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलेल नाही. त्यातच आज सकाळी चिपळूण येथे नवीनच टाकलेल्या गर्डरला तडा गेल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्याचवेळी हा गर्डर तुटणार त्याची चर्चा सुरू होती. आज सकाळी आठ वाजता एक मोठा आवाज होऊन बरोबर उड्डाणपुलाच्या मधोमध असलेला एक गर्डर क्रॅक जाऊन तुटला. यावेळी त्याचे काही अवशेष हे खाली पडले. मात्र त्यावेळी उड्डाणपुलाच्या जवळ कोणीही नागरिक किंवा कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. नवीन कामाची जर ही अवस्था असेल तर या उड्डाणपुलाच्या भवितव्य काय असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांमधून विचारला जातोय. ज्या वेळेला या गडरचा काही भाग कोसळला त्यावेळेला त्या ठिकाणी कोणताही सेफ्टी इंजिनियर अथवा कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींमधून नाराज यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर हा प्रकार घडल्यानंतर सेफ्टी इंडिनिअर तिथे पोहोचला होता. यावेळी या घटनेप्रकरणी सेफ्टी इंजिनिअरला मारहाण करण्यात आली आहे.


रस्त्याच्या कामात लोखंडी सळ्यांचा वापरच नाही 


मुंबई-गोवा महामार्गावर मोठमोठे डंपर आणि सिमेंट मिक्सर मशीन रात्रंदिवस काम करत आहेत. एका लेनवर सातत्याने काँक्रीटीकरण केले जात आहे. मात्र, रस्त्यावर केवळ सिमेंट आणि खडीचा वापर केला जात आहे. यामध्ये आवश्यक असलेल्या लोखंडी सळ्यांचा वापर केला जात नसल्याचा आरोप मनसे नेते योगेश चिले यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. जर लोखंडी सळ्या वापरल्या गेल्या नाहीत तर या ठिकाणी असलेल्या कामांमध्ये निकृष्टपणा येऊन हे सिमेंट काँक्रीट केवळ सहा महिन्यांमध्ये उखडू शकते. या रस्त्यावर पुन्हा-पुन्हा खड्डे पडू शकतात. ही जनतेच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक आहे. त्यामुळे सरकारने ही फसवणूक थांबवावी असं चिले यांनी म्हटलं होतं.