धक्कादायक! रागडावर प्री-वेडिंग शूट, पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष
होळीचा माळ तसेच किल्ल्यावरील बाजारपेठ परिसरात जोडप्याना घेऊन फोटो सेशन सुरू असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे
रायगड: महाराष्ट्राच्या काळ्या मातीची शान आणि वैभव असलेल्या गड-किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घातल्याची घटना ताजी असताना आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगडावर प्री वेडिंग शूट होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. होळीचा माळ तसेच किल्ल्यावरील बाजारपेठ परिसरात जोडप्याना घेऊन फोटो सेशन सुरू असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे . या घटनेनंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
रायगड किल्ल्याचा परिसर हा पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. असं असतानाही किल्ले रायगडावर व्यावसायिक शूटिंगला परवानगी कुणी आणि कशी दिली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.
इतकच नाही तर हा प्रकार पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे झाला की संगनमतानं अशी चर्चाही जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
गड-किल्ले आणि त्यांचा इतिहास यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी एकीकडे पुरातत्त्व विभाग आणि सरकार प्रयत्न करत असताना आता या प्रकरणी काय कारवाई केली जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान याआधी कोल्हापूर जिल्ह्यातल्या रांगणा किल्ल्यावर जबरदस्त राडा झाला होता.
काही गावकरी पार्टी करायला किल्ल्यावर दारू आणि बकरे घेऊन पोहोचले. त्यांनी गडावर पार्टी केल्याची माहिती मिळताच गडावरून खाली उतरल्यानंतर त्यांना शिवप्रेमींनी बेदम चोप दिला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा रायगडावरील प्री-वेडिंगचा प्रकार समोर आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.