प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिल्लक पगार मागायला आलेल्या एका महिलेला तळा गर पंचायतीच्या नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर आणि त्यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांनी शिवीगाळ करत चक्क लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नगर पंचायत कार्यालयाच्या आवारातील या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ समोर आलाय. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगला पारखे असं या महिलेचे नाव आहे. ती नगरपालिकेत ग्रंथपाल म्हणून काम पाहत होती. निवृत्त झाल्यावर देखील पगाराची रक्कम नगर पालिकेतून येणं बाकी होती. दिवाळीसाठी हा पगार मागायला ती गेली. पण पगार देण्याऐवजी मंगला पारखे यांना मारहाण करण्यात आली.  पुन्हा इथं आलीस तर ठार मारू अशी धमकीही नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर यांनी दिल्याचा आरोप मंगला पारखे यांनी केलाय.



झालेल्या प्रकाराने महिला प्रचंड भीतीच्या सावटाखाली आहे. या प्रकरणी तळा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा परिसरात निषेध होत आहे.