शिवसैनिकांनी निलेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
निलेश राणे यांचे थेट बाळासाहेब ठाकरेंवर आरोप
महाड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं महाडमध्ये दहन करण्यात आलं. महाड शिवसैनिकांनी पुतळ्याला जोडेही मारले. तसंच नारायण राणे, आणि निलेश राणेंविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गातील मेळाव्यात नारायण राणे यांच्यावर खुनाचे आरोप केले होते. त्याला उत्तर देताना निलेश राणे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर निशाणा साधल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना आहे.
निलेश राणेंचे गंभीर आरोप
निलेश राणे यांनी रत्नागिरीत थेट बाळासाहेबांवर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातले शिवसेना नेते आनंद दिघे यांना कोणी मारलं? गायक सोनू निगम यांना ठार मारण्याचे कुणी प्रयत्न केले? ठाकरे घराणं आणि गायक सोनू निगमचं नातं काय? बाळासाहेबांच्या कर्जतमधल्या फार्महाऊसवर कुणा-कुणाला ठार मारलं? हे सर्व जाहीर सभेत सांगू शकतो, असा इशाराच निलेश राणे यांनी दिला. सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या १० वर्षांतल्या राजकारणात ९ जणांचा बळी नेमके कुणी घेतले?, असा सवाल करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं.
आनंद दिघेंची हत्या?
'आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला? कट कसा रचला गेला आणि त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये कसा दाखवण्यात आला? दिघेंचा मृत्यू दोन शिवसैनिकांना सहन झाला नाही. त्यांनी तोंड उघडू नये यासाठी त्यांनाही बाळासाहेबांच्या सांगण्यावरून ठार मारण्यात आलं', असंही निलेश राणेंनी म्हटलं आहे.