कल्याण : दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील मोहनेत पुरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या मुलासह त्याच्या आईवडिलांची स्थानिकांनी सुखरुप सुटका केली. मोहनेमधील यादव नगरमधील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी स्थानिक तरूणांनी धाव घेतली. त्यांनी चाळीस ते पन्नास लोकांची सुटका केली. यात एका सहा महिन्यांच्या मुलाचाही समावेश होता. सहा महिन्यांच्या चिमुकल्याला पाण्यातून वाचवल्याचा सर्वाधिक आनंद झाल्याचे या तरूणांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आज कल्याणमध्ये ग्रामीण भागात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. काळू नदीवर पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पुरामुळे येथील दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे. तर उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. उल्हास पुलाला पाणी लागले आहे. त्यामुळे हा पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण - अहमदनगर रस्ता बंद करण्यात आला आहे. येथील वाहतूक थांबविण्यात आली आहे. 


तर दुसरीकडे कल्याण पश्चिम येथील मोहाने परिसरात असलेल्या जुना मोहिली जलशुद्धीकरण केंद्राची सौरक्षण भिंत कोसळल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामध्ये या जलशुद्धीकरण केंद्रातही पाणी साचले होते आणि त्यामुळे ही भिंत कोसळली आहे.