Rain Forecast : यावर्षी देशभरात सरासरीहून कमी पावसाची शक्यता आहे (Chances of Below Average Rainfallः). देशात यावर्षी सरासरीच्या केवळ 94 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्कायमेट (Skymate) या खासगी हवामान शाळेने (Department of Meteorology) हा अंदाज वर्तवला आहे. गेल्या चार वर्षात अल निनोमुळे (El Nino) चांगला पाऊस झाला पण यावर्षी अल निनोचा प्रभाव वाढल्यामुळे पाऊस कमी पडेल असं सांगितलं जातंय. मध्य आणि उत्तर भारतात कमी पावसाचा इशारा देण्यात आलाय. जुलै ते ऑगस्ट काळात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये कमी पावसाची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात अवकाळी पावसाचा फटका
एकीकडे कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकरी हैराण झाले आहेत. राज्यात तब्बल 38 हजार हेक्टरवर अवकाळी, गारपिटीमुळे नुकसान झालंय. सटाणा तालुक्यात 1000 हेक्टरवर कांद्याचं नुकसान झालंय. हे नुकसान गेल्या 2 दिवसांत झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे झालंय. राज्यात सुमारे 10 हजार एकरवरील द्राक्षबागांना अवकाळीचा तडाखा बसलाय. द्राक्षांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असून दर आणि मागणी अभावी द्राक्ष अजूनही काढणीच्या प्रतिक्षेत आहेत. द्राक्षबागांचं नुकसान झाल्यामुळे बेदाणा निर्मिती उद्योगालाही फटका बसलाय. 


गहू जमिनदोस्त
येवल्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय. शेतात काढून ठेवलेला कांदा  पूर्णपणे भिजलाय. तर गहूचं देखील जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे. कांद्याचा उत्पादन खर्च  निघणंही मुश्किल झाल्याने शेतकरी राजा संकटात सापडलाय.


बाजरीचं पीक झालं आडवं
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीनं झोडपलंय .शेतातलं उभं बाजरीचं पीक जमिनदोस्त झालंय. फुलोरा गळून गेल्यानं बाजरीला दाणे भरणार नाहीयेत. बाजरीचं पीक वाया गेल्यानं बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय..


फळबागांचं मोठं नुकसान
वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडखा बसलाय. वादळी वा-यासह पावसानं हजेरी लावलीय. यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. गहू, ज्वारी, मूग, कांदा, टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर पपईची झाडं जमीनदोस्त झालेत. 


अस्मानी संकटाने शेतकरी संकटात
मालेगावमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. काढणीला आलेलं कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय. पुन्हा अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालाय. 


आंब्याचा मोहोर गळाला
नाशिक जिल्ह्यात टाकेत दारणा भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालाय. त्यात फळझाडांचं प्रचंड नुकसान झालंय. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे चिंचा आणि आंब्याचं प्रचंड नुकसान झालंय. चिंचांची झाडं शेतकऱ्याला पूरक उत्पन्न मिळवून देतात. मात्र या चिंचाच गारांमुळे अक्षरशः मातीमोल झाल्या आहेत. आंब्याचा मोहोरही गळून पडलाय. 


द्राक्ष, टरबूज पिकांचं नुकसान
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धाराशिव जिल्ह्यात द्राक्ष, टरबूज, आंबा, केळी या फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय...तर भाजीपाला, इतर पीकही उद्ध्वस्त झालीयत. कळंब, तुळजापूर भागात मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडून गेलेयत.


उभं पीक मातीमोल
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर गारपिटीने होत्याचं नव्हतं केलंय. लिंबू, बोराच्या आकाराच्या गारा पडल्याने काढणीला आलेला कांदा, कांदा बियाणे, फळबागा आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला. वादळी वारा आणि पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले तर झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, मका, टोमॅटोसह गहू पिकाचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेलं गहू पीक जमीनदोस्त झालंय. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात दारणा नदीकाठच्या परिसरामध्ये बहुतांशी पीक मातीमोल झालंय.