मोठ्या विश्रांतीनंतर अकोला, पुण्यात जोरदार पावसाची हजेरी
मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं पुन्हा आगमन
अकोला : तब्बल वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोला शहरातही जोरदार पाऊस झालाय. पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अकोला शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातही हा पाऊस झाला आहे. बळीराजा आता बरसलेल्या या पावसानंतर पेरणीला सुरुवात करणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
मोठ्या विश्रांती नंतर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यांवरील सखल भागात पाणी साचल्याचं चित्र पहायला मिळालं. तर काही ठिकाणी रस्त्याची काम अपुर्ण राहिल्यानं वाहनचालकांची गैरसोय झाली. तर मुसळधार पावसाने पिंपरी चिंचवडला अक्षरशः झोडपून काढले. दुपारी साडे तीनच्या सुमाराला पावसाला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात शहराच्या अनेक भागांना पावसाने झोडपून काढले. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरवासीय मात्र चांगलेच सुखावले आहेत.