`ऑक्टोबर हीट`मध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं नुकसान
सर्वाधिक नुकसान आदिवासी वाडीवरील तब्बल २५ घरांचे झाले
रत्नागिरी : रत्नागिरीत काल मध्यरात्री अचानक मेघगर्जनासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली अचानक आलेल्या पावासामुळे रत्नागिरीकरांची चांगलीच तारांबळ उडाली. रत्नागिरीत सध्या ऑक्टोबर हीटची तडाखा असताना संध्याकाळी मात्र अचानकपणे जोरदार वारे वाहू लागले आणि मघगर्जनेसह मुसळधार पावासाला सुरूवात झाली. जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतल्या काही भागातील वीज वाहिन्यांवर झाडं पडून वीज पुरवठा खंडीत झाला.
रत्नागिरीत सध्या भात कापणीची कामं सुरू आहेत त्यामुळे या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आधीच शेतीला पाणी नसल्यामुळे कातळावरची शेती करपून गेलीय त्यात अचानक पाऊस पडल्यामुळे कोकणातल्या शेतीचं मोठं नुकसान होणार आहे.
मागील दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात चांगलाच दणका दिला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह येणाऱ्या पावसाने मोठे नुकसान केले आहे.
सुधागड तालुक्यातील कवेळे परिसरात पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली. सर्वाधिक नुकसान आदिवासी वाडीवरील तब्बल २५ घरांचे झाले. काही घरांचे पत्रे उडून दुसऱ्या घरावर पडल्याने त्या घरांचेही नुकसान झालेले आहे.
या पडझडीत १३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनाम्याचे काम सुरू केले आहे.