मुंबई : दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज ढगाळलेलं वातावरण आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गुरुवारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचा प्रभाव या आठवड्याच्या अखेरीपर्यंत कायम राहील. विदर्भातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Rain Alert in Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूरमध्ये या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपुरात तब्बल 45.4 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात सूर्य आग अक्षरशः ओकत आहे. उष्णतेच्या झळांनी विदर्भवासीय पुरते हैराण झाले आहेत.


गुरुवार ते शनिवार दरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे ही पावसाची शक्यता आहे. पुणे, अहमदनगर नाशिक येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.