राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून ५ जणांचा मृत्यू
राज्यात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली.
मुंबई : राज्यात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यात अंगावर वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. तर बुलडाणा जिल्ह्यात वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. तर इतर दोन महिला आणि एक मुलगी किरकोळ जखमी झालीत. जालन्यात वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एक जण किरकोळ जखमी झाला. तर पुणे जिल्ह्यात आणि संगमनेरमध्ये संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली.
बुलडाणा जिल्ह्यात पावसाची हजेरी
बुलडाणा जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे अंगावर वीज कोसळून सारजाबाई भगत यांचा मृत्यू झाला. तर इतर दोन महिला आणि एक मुलगी किरकोळ जखमी झाली.. शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर विज कोसळली.
हिंगोलीत अंगावर वीज कोसळली
हिंगोली जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान अंगावर वीज कोसळून जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला. वसमत तालुक्यातील गुंडा गावामध्ये बाबाराव गंगाराम चव्हाण हे पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली उभे होते. त्यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले. तर दुसरी घटना खंडेगाव-फाटा परिसरातच घडली. फाटा गावातील १६ वर्षीय तरुणी लोचना काकडे आणि गयाबाई काकडे यांच्या अंगावर वीज कोसळून दोघींचा मृत्यू झाला.
जालन्यात शेतकऱ्याचा मृत्यू
जालन्यात वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडलीय. जाफराबाद तालुक्यातील रासतळ गावात ही घटना घडलीय.एकनाथ नारायण डव्हळे असं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचं नाव आहे. जखमी झालेल्या जगदेवराव कदम यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, संगमनेरमध्ये संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. पावसामुळे चंदनापुरी घाटातील तांबकडा धबधबाही प्रवाही झाला आहे.
पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळी साडे सातच्या सुमाराला विविध भागात पावसाला सुरुवात झाली. दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रातही पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यामध्ये वाढ होत आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने शिरूर तालुक्यात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे करपत चाललेल्या खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पाऊस असाच बरसत रहावा, अशी प्रार्थना बळाराजाने आहे.