मुंबई : राज्याच्या कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे. परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. तर राज्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परतीचा पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वदूर अशी वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने वाहणारे वारे आणि ढगफुटीतून निर्माण होणारी अतिवृष्टीची परिस्थिती यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्णपणे भरली आहेत. बारामती तालुक्यालाही मोठा फटका बसला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु  आहे.


राज्यात सर्वाधिक फटका हा सांगली जिल्ह्याला बसला आहे. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. तसेच वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री   ठाकरे यांनी दिले आहेत. तर नुकसानीची माहिती घेतल्यानंतर नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करावेत. पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.


तर पंढरपुरातील कुंभार घाट येथे अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. पावसाचा जोरदार तडाखा बसल्याच्या  परिस्थितीचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सकाळपासूनच आढावा घेणे सुरु केले. मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच गृह विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतानाच,  त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी आणि समन्वय आणि संनियत्रणावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यक त्याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात आणि तातडीच्या मदतीसाठी अग्निशमन, पोलिस, तसेच महसूल आणि वैद्यकीय अशा सर्वच विभागांना मदत पथके पाठविण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.