पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray )यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी आजच्या जीवनातही बाबासाहेबांच्या लेखणीच्या माध्यमातून साकारलेल्या शिवचरित्राची कशी मदत होते याचीच ग्वाही त्यांनी दिली. बाबासाहेबांच्या लेखनामध्ये आलेल्या अनेक गोष्टींवर त्यांनी यावेळी प्रकाशझोत टाकत आपलं निरीक्षणंही नोंदवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडणवीस हे मुळ आडनाव नाही


तत्कालीन मराठी भाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा आणि बाबासाहेबांच्या लेखणीतून आलेल्या संदर्भांबाबत बोलताना राज ठाकरे यांनी एक उदाहरण सांगितलं. आडणावं कशावरुन आली, याबाबत सांगताना फडणवीस हे काही मुळचं आडनाव नाही असं ते म्हणाले. फडणवीस हे मुळ आडनाव नसून, त्यासाठी फारसी भाषेतील फर्दनवीस हा शब्द आहे. फर्द म्हणजे कागद आणि नवीस म्हणजे कागदावर लिहिणारा आणि त्यानंतर कागदाऐवजी फड आला, त्यामुळे फडावर लिहिणारे ठरले फडणवीस, असं उदाहरण त्यांनी देत आपल्याला या साऱ्यामध्ये रस असल्याचं त्यांनी सांगितलं. 


राजकीय पक्षांमध्ये साचलेपणा नको 
महापालिका निवडणुकांसाठी पक्षाचं धोरण नेमकं कसं असेल याबाबत त्यांनी बऱ्या अंशी गोपनियता राखली. मागील काही दिवसांपासून सातत्यानं सुरु असणाऱ्या बैठकींबाबत सांगताना, अनके पक्षांमध्ये एक साचलेपणा येतो, त्याला हलवून जागेवर ठेवणं, काही ठिकाणी बदल करणं हे सर्व दृष्टीकोनातून महत्त्वाचं असतं. हे याआधीच व्हायला हवं होतं, पण लॉकडाऊनमुळे हे शक्य झालं नाही. त्यामुळं आता वेळ मिळेल तसा त्यातही लक्ष घालत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 


अमित ठाकरेंवर मोठी जबाबदारी? 
अमित ठाकरेंवरच सर्व जबाबदारी सोपवण्यात आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला असता तसं नसून नेत्यांवर पक्षाची जबाबदारी असल्याचा मुद्दा त्यांनी उजेडात आणला. भाजपसोबत मनसेची युती होणार का, या प्रश्नावर उत्तर देत चंद्रकांत पाटील आणि फडणवीस यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. 'मी चंद्रकांत पाटील यांना क्लीप पाठवलेली नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं. 'उत्तर भारतीयांसाठी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ ऐकून एका क्लीपवरुन युतीचे सूत जुळवू नका', असं ते म्हणाले. 


मुंबई लोकल प्रवास सुरु करण्याबाबत सातत्यानं होणारी मागणी पाहता रेल्वेमध्ये लसींचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश का दिला जात नाही असा सवाल त्यांनी केला. राज्य शासनाकडून वारंवार लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या मुद्द्यावरही त्यांनी टीका केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला घाबरून आतापासूनच घरात बसावं का?, यांना काय जातं लॉकडाऊन करायला?, त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही... हे म्हणजे लॉकडाऊन आवडे सरकारला अशा शब्दांत त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना  सणसणीत टोला लगावला. 


Babasaheb Purandare 100th Birthday : शिवगाथा जगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना रांगोळीच्या माध्यमातून मानाचा मुजरा 


 


पूरपरिस्थितीसाठी जबाबदार कोण? 
पूरपरिस्थितीसाठी ढिसाळ नियोजनाला कारणीभूत ठरवत राज ठाकरे यांनी पूरग्रस्त कोल्हापूर, कोकण या ठिकाणांचा उल्लेख केला. विकासाचे आराखडे आणता पण टाऊन प्लान का आणत नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शहर नियोजनावर भर दिला. नद्यांवर झालेल्या अतिक्रमणाकडेही राज ठाकरे यांनी यावेळी लक्ष वेधलं. मुंबईत दरवर्षी पाणी तुंबण्याच्या होणाऱ्या घटना पाहता इथं नियोजनाचा मोठा अभाव असल्याची भावना त्यांनी व्यक्त करत याला काय नियोजन म्हणावं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.