कपिल राऊत, झी मीडिया : राज्याच्या राजकारणात सध्या जोरदार वारं वाहताना दिसत आहे. त्याला कारण ठरतंय अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri bypoll)... मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? या भेटीमागं नेमकं काय राज दडलंय? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. या भेटीमुळे अनेकांच्या भूवया देखील उंचावल्या आहेत. अशातच आता या भेटीमागचं नेमकं 'राज' काय?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.


राज ठाकरे-एकनाथ शिंदेंची तासभर खलबतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) शनिवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यावेळी स्वतः एकनाथ शिंदेंनी गुलाबांचा गुच्छ देऊन राज ठाकरेंचं खास स्वागत केलं. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून ठाकरे गट विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगतोय. एकीकडं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असतानाच, राज आणि शिंदेंची (Eknath Shinde) ही भेट झाल्यानं तिला विशेष महत्त्व आलंय.


अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेचा भाजपला पाठिंबा?


राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये तब्बल तासभर खलबतं झाली. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेनं भाजप उमेदवार मुरजी पटेल यांना पाठिंबा द्यावा, यासाठी दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर भाजप-शिंदे गट युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी एखादी सभा घ्यावी, यासाठी शिंदेंनी आग्रह धरल्याचं समजतंय.



भेटीमागचं नेमकं 'राज' काय?


आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Elections) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) हरवण्यासाठी मनसे आणि शिंदे गटानं एकत्रित रणनीती आखावी, यादृष्टीनंही दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेनं सुचवलेल्या काही योजनांना ठाकरे सरकारनं स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठवण्यासाठी यावेळी चर्चा झाल्याचंही समजतंय. गेल्या 2 महिन्यात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातली ही तिसरी भेट आहे, त्यामुळे शिंदे ठाकरेंमध्ये काय शिजतंय? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसतोय.


आणखी वाचा - Andheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांनी भरला अर्ज, कोण मारणार बाजी?


एकनाथ शिंदेंनी बीकेसी मैदानात घेतलेल्या दसरा मेळाव्याला (Dasra Melava) ठाकरे घरातील तीन प्रमुख व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित होत्या. जयदेव बाळासाहेब ठाकरे, स्मिता ठाकरे आणि निहार बिंदूमाधव ठाकरे. ठाकरे कुटुंबातील लोक आपल्यासोबत असल्याचं दाखवून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी घरचा आहेर दिला. आता राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना राजकीय दणका देण्याचा करेक्ट कार्यक्रम शिंदेंनी आखलाय की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.